
बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंच्या देशांतर्गत सामन्यातील मानधन वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिला खेळाडूंना आता प्रथम श्रेणी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रति सामना 50 हजार रुपये मानधन मिळणार आहे. याचबरोबर टी-20 सामन्यासाठी 25 हजार रुपये दिले जातील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘बीसीसीआय’ने यापूर्वीच महिला आणि पुरुष खेळाडूंचे सामना मानधन समान केलेले आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुरुषांइतकेच मानधन
बीसीसीआयने 22 डिसेंबरला झालेल्या ऑनलाईन बैठकीत महिला खेळाडूंचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंना समान मानधन मिळेल. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अंतिम अकरामध्ये असलेल्या खेळाडूंना प्रति दिवस 50 हजार रुपये मिळतील, तर प्लेइंग-11 बाहेरील खेळाडूंना 25 हजार रुपये दिले जातील. वनडे सामन्यात अंतिम अकरामधील खेळाडूंना 50 हजार, तर संघातील इतर खेळाडूंना 25 हजार रुपये मिळतील. टी-20 सामन्यांत अंतिम अकरामधील खेळाडूंना 25 हजार रुपये, तर बेंचवर असलेल्या खेळाडूंना 12,500 रुपये दिले जातील. यापूर्वी महिला खेळाडूंना टी-20, वन डे आणि प्रथम श्रेणी सामन्यात प्लेइंग-11 मध्ये असण्यासाठी केवळ 20 हजार रुपये मिळत होते, तर बेंचवर असलेल्या खेळाडूंना 10 हजार रुपये दिले जात होते.
ज्युनियर क्रिकेटपटूंची फीही वाढली
राज्य आणि झोनल संघांकडून खेळणाऱया ज्युनियर महिला क्रिकेटपटूंची मानधनातही वाढवण्यात आली आहे. आता वन डे आणि प्रथम श्रेणी सामन्यांत अंतिम अकरामध्ये असलेल्या ज्युनिअर खेळाडूंना 25 हजार, तर बेंचवरील खेळाडूंना 12,500 रुपये मिळतील. टी-20 सामन्यांत अंतिम अकरामधील खेळाडूंना 12,500, तर अतिरिक्त खेळाडूंना 6,250 रुपये दिले जातील.
एका सीझनमधील कमाईत वाढ
‘बीसीसीआय’च्या माहितीनुसार, यापूर्वी सीनियर महिला खेळाडूंना देशांतर्गत लीग स्टेजचा एक हंगाम खेळल्यावर सुमारे 2 लाख रुपये मिळत होते. मात्र आता केवळ 4 वन डे सामने खेळूनच खेळाडू 2 लाख रुपये कमावू शकतील. संपूर्ण हंगामामध्ये आता खेळाडूंना 5 ते 7 लाख रुपयांपर्यंत कमाई होणार आहे. सामन्यांची संख्या वाढल्यास उत्पन्नातही वाढ होईल.
पंचांचेही मानधन वाढविले
महिला क्रिकेटसोबतच ‘बीसीसीआय’ने सामनाधिकारी आणि पंचांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लीग स्टेजमध्ये एका दिवसासाठी पंचांना 40 हजार रुपये मिळतील, तर नॉकआऊट सामन्यांत हे मानधन 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत असेल. देशातील 79 सामनाधिकाऱयांनाही पंचांइतकेच मानधन देण्यात येणार आहे.




























































