ठाण्यातील नाल्यात आढळले वासरांचे मृतदेह

शहरातील गजबजलेल्या मानपाडा भागात एका नाल्यामध्ये आज रात्री उशिरा गाईंच्या पाच वासरांचे मृतदेह आढळून आले. त्यांच्यावर विषप्रयोग झाला की हत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात संताप व्यक्त होत असून वासरांचे मृतदेह घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

ठाण्यातील मानपाडा हा दाटीवाटीचा परिसर आहे. रात्री येथील नाल्यामध्ये पाच वासरांचे मृतदेह पडल्याचे काही दक्ष नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला याबाबत कळवले. त्यानंतर पालिकेचे पथक, पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व जेसीबीच्या सहाय्याने सर्व मृतदेह बाहेर काढले. ही वासरे नाल्यात कशी आली तसेच ती कोणाच्या मालकीचे आहेत याचा तपास चितळसर पोलीस व महापालिकेचे अधिकारी करीत आहेत.