
विमान निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या Boeing ने त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. डेनिल मिलेनबर्ग यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा संचालक मंडळाने केली आहे. कंपनीने गमावलेला विश्वा कमावण्यासाठी हे पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे झाले होते असं संचालक मंडळाने म्हटले आहे. बोईंगचे सध्याचे अध्यक्ष डेव्हीड कॅलाहान हे डेनिस यांची जागा घेणार असून ते 13 जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
गेल्या वर्षी आणि मार्च 2019 मध्ये बोईंगच्या दोन विमानांचा अपघात झाला होता. या अपघातांमुळेच डेनिस यांची हकालपट्टी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही दुर्घटनांमुळे बोईंग कंपनीच्या विमानांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं आणि कंपनीवर प्रचंड टीकाही झाली होती. बोईंगने एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं असून यात म्हटलंय की ‘ कंपनीने गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी आपल्या नेतृत्वात बदलाची गरज होती, यामुळेच संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.सोबत काम करणाऱ्यांसोबतचे संबंध सुधारण्यासाठी उचललेले हे एक पाऊल आहे. फक्त सोबत काम करणारेच नाही तर बोईंगचे कम्चारी आणि ग्राहकांचे बोईंगसोबतचे संबंध सुधारावेत यासाठी घेतलेला हा निर्णय आहे.’ प्रवाशांना अधिक सुरक्षा मिळावी आणि निरंतर सेवा उत्तम होत जावी यासाठी घेतलेला हा एक उत्तम निर्णय असल्याचं संचालक मंडळाने म्हटलं आहे. डेनिस यांच्या हकालपट्टीसोबतच संचालक मंडळाने लाँरेंन्स कॅलनर यांना अकार्यकारी संचालक बनविले आहे.
मिशेल स्टुमो यांच्या मुलीचा म्हणजेच साम्या रोज हिचा बोईंग 737 विमानाच्या अपघातात मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर मिशेल यांनी बोईंगविरोधात आघाडी उघडली होती. मिशेल यांनी डेनिस यांच्या हकालपट्टीची बातमी ऐकल्यानंतर या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी बोईंगच्या संचालक मंडळात अनेकजण पदायोग्य नसून ते काहीच काम करत नसल्याचा आरोप केला आहे. या संचालकांचाही राजीनामा घ्यायला हवा असं मिशेल यांनी म्हटलं आहे.
बोईंग विमानांचे 5 महिन्यांच्या काळात दोन अपघात झाले होते. यातील एक अपघात हा इंडोनेशियामध्ये तर दुसरा अपघात हा इथिओपियामध्ये झाला होता. या दोन्ही अपघातात मिळून 346 जणांचा मृत्यू झाला होता. जेव्हा या दुर्घटनांची चौकशी करण्यात आली आणि बोईंग विमानांची तपासणी करण्यात आली तेव्हा यातील स्वयंचालित नियंत्रण प्रणालीत दोष असल्याचं आढळून आलं होतं. या प्रणालीने चुकीचे आकडे दाखवल्याने वैमानिकांनी विमान ज्या उंचीवरून उडच होतं ते अचानक कमी करून खाली आणलं होतं.




























































