मुरबाड तहसीलदार कार्यालयाने मृतांच्या नावे बनवले रेशनकार्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोपाळ पवार । मुरबाड

शासनदरबारी वास्तव्याचा पुरावा म्हणून आवश्यक लागणारे व गोरगरीबांना स्वस्त धान्य पुरवठ्यासाठी लागणारे दस्तावेज म्हणून रेशनकार्ड लागते. ही रेशनकार्डे मुरबाड तहसीलदार कार्यालयाने मृत आदिवासी व्यक्तींच्या नावे बनवून दिल्याचा धक्कादायक उघड झाला आहे. बनावट कार्ड बनवून देणारे अधिकारी, कर्मचारी व ही कार्डे बनवून घेणाऱ्यांवर तात्काळ कारवाईसाठी ग्रामस्थांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

मुरबाड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाकडून रेशनकार्ड संदर्भात कामे केली जातात. नवीन रेशनकार्डे बनवितांना अनेक प्रकारची कागदपत्रे व चौकशी अहवाल पाहिले जातात. परंतु मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावातील मयत झालेले आदिवासी हेमाडे गंगूबाई महादू ,वडेकर कमा देवजी,कोकाटे रामा चिमा, यंदे पोसू रामचंद्र आणि याच गावातील मार्के बाबू कृष्णा ही रेशनकार्डे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनविल्याचे उघड झाले आहे. रेशनकार्डे बनवून त्यावरील धान्यसाठा रेशनदुकानदाराने उचलून वाटप केल्याचेही महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पूरवठा विभागाच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे दिसत आहे. प्रत्येक महिन्याचा मृत व्यक्तींच्या नावावरिल धान्यसाठा शासकीय गोदामातून उचलल्याचे संकेतस्थळावर दिसत आहे.

नवीन रेशनकार्डे बनवितांना अर्जासोबत स्थानिक वास्तव्याचा पुरावा, सरपंच, पोलीस पाटील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींंनी दिलेला वास्तव्याचा दाखला, जन्मदाखला,तलाठी यांचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन अर्जदार व साक्षीदार यांच्या सोबत केलेला पंचनामा आणि पुरवठा निरिक्षक व पुरवठा निरिक्षण अधिकारी यांचा अहवाल दिल्यानंतरच रेशनकार्ड बनवून त्यावर नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांची सही होते, असे असताना प्रस्तुत मृत व्यक्तींची रेशनकार्डे कोणत्या अधिकाऱ्याने बनवून दिली. याबाबत जांभुर्डे गावातील ग्रामस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांविषयी संताप व्यक्त करत आहेत. मयत आदिवासींंच्या नावाचा वापर करून रेशनकार्डे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कोणी बनवली व त्या रेशनकार्डांवरील उचललेले धान्य कुठे जाते या गंभीर प्रश्नी त्वरित चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.