
मुंबईतील दुबार मतदारांचा मुद्दा यंदा महापालिका निवडणुकांमध्ये ऐरणीवर आला आहे. मुंबईत पहिल्या टप्प्यात तब्बल साडे अकरा लाख दुबार मतदार सापडले. त्यानंतर या मतदारांची अत्यंत काटेकोर पडताळणी केल्यानंतर सध्याच्या घडीलाही प्रत्यक्षात दीड लाख दुबार मतदार आहेत. यांच्या मतदानावर निवडणूक आयोगाचे लक्ष आहे. दरम्यान बोगस मतदार सापडला तर त्याला थेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, असा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिला.
मुंबईत महापालिका निवडणुकांच्या मतदानाच्या तयारीचा निवडणूक आयोगाच्यावतीने आज आढावा घेण्यात आला. त्यात दुबार मतदारांचाही मुद्दा होता. त्यातील दुबार मतदाराच्या मुद्दय़ावर भाष्य करताना दिनेश वाघमारे म्हणाले की, मुंबईत सुरुवातीला साडे अकरा लाख दुबार मतदार आढळून आले; पण प्रत्यक्ष पडताळणी आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काटेकोर तपासणी केली तेव्हा दीड लाख दुबार मतदार आहेत. मुंबईत 10 हजार 231 मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रे आणि दुबार मतदार यांची सरासरी काढल्यास एका मतदान केंद्रावर चौदा ते पंधरा दुबार मतदार येतात.
या दुबार मतदारांना मतदानासाठी दोन पर्याय दिले आहेत. एक तर जो दुबार मतदार ज्या ठिकाणी मतदान करणार आहे त्याने फॉर्म भरून द्यायचा आहे. फॉर्म भरून दिल्यावर त्याला त्याच मतदान केंद्रात मतदान करता येईल. इतर दुसऱ्या कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही आणि ज्या दुबार मतदाराने फॉर्म भरून दिला नाही त्याने हमीपत्र द्यावे की, आपण तर कुठल्या मतदान केंद्रावर मतदान केलेले नाही किवा नंतर मतदान करणारही नाही. असे हमीपत्र दिल्यावर मतदाराकडील आधार कार्ड किंवा तत्सम पुराव्यांची पडताळणी केली जाईल. योग्य पुरावे सादर केल्यानंतर त्याला मतदानाचा हक्क बजावण्यास दिला जाईल.
बोटावर मार्करची शाई
विधानसभा निवडणुकीत मतदाराच्या बोटावर काडीने शाई लावली होती. पण आता इंक मार्करचा वापर होईल. शाईमध्ये कोणताही बदल केलेला नाही. फक्त मार्करचे तंत्रज्ञान वापरले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.




























































