Air India – 787 आणि 737 विमानांच्या फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही; तपासणीनंतर केले जाहीर

एअर इंडियाने त्यांच्या ताफ्यातील सर्व बोईंग 787 आणि बोईंग 737 विमानांच्या इंधन नियंत्रण स्विच (FCS) च्या लॉकिंग सिस्टमची तपासणी पूर्ण केली आहे. मंगळवारी (22 जुलै) त्यांनी सांगितले की, इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणतीही समस्या आढळली नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानांची सुरक्षिततेसाठी तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. DGCA च्या सूचनांनुसार ही चौकशी करण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, “एअर इंडियाने त्यांच्या ताफ्यातील सर्व बोईंग 787 आणि बोईंग 737 विमानांच्या इंधन नियंत्रण स्विच (FCS) च्या लॉकिंग सिस्टमची खबरदारीची तपासणी पूर्ण केली आहे. त्यात कोणतीही समस्या आढळली नाही.” गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर विमान अपघातानंतर ही तपासणी करण्यात आली. यात 260 जणांना आपला जीव गमवावा लागला.

एअर अपघात तपास ब्युरो (AAIB) च्या सुरुवातीच्या अहवालात असे दिसून आले आहे की, इंधन पुरवठा थांबल्यामुळे विमानाचे इंजिन टेकऑफनंतर काही सेकंदात थांबले. याचे कारण इंधन स्विच ‘रन’ वरून ‘कटऑफ’ मध्ये अचानक बदलणे होते. यामुळे इंजिन इंधन कट-ऑफ स्विचच्या कार्यप्रणालीबद्दल पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.

अहमदाबादमधील अपघातानंतर आणि 14 जुलैला डीजीसीएने जारी केलेल्या निर्देशानंतर, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने तात्काळ तपासणी सुरू केली होती. ही तपासणी 12 जुलैला सुरू झाली आणि नियामकाने दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात आली.

कंपनीने म्हटले आहे की, ज्या बोईंग 737 विमानांची तपासणी करण्यात आली. तपासणी पूर्ण झाल्यानंतर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोघांनीही डीजीसीएला माहिती दिली आहे आणि सुरक्षा सूचनांचे पूर्णपणे पालन केले आहे. एअर इंडियासोबतच एमिरेट्स इत्यादी अनेक प्रमुख जागतिक विमान कंपन्या देखील खबरदारी म्हणून त्यांच्या बोईंग विमानांवर अशाच प्रकारची तपासणी करत आहेत.