अक्षय कुमारला मिळालं हिंदुस्थानी नागरिकत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमार याने 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय कुमार याला हिंदुस्थानी नागरिकत्व मिळालं आहे. त्याने फोटो शेअर करून ही बातमी शेअर केली आहे.

अक्षय कुमार उर्फ राजीव भाटिया याच्याकडे यापूर्वी कॅनडाचं नागरिकत्व होतं. गेल्या अनेक वर्षांपासून तो हिंदुस्थानी नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याला बऱ्याचदा ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं. सोशल मीडियावर कॅनडा कुमार असं म्हणून त्याची खिल्लीही उडवली गेली. हिंदुस्थानात काम करून इथेच पैसे कमवत असूनही हिंदुस्थानी नागरिकत्व नाही, असं म्हणून त्याला ट्रोल केलं गेलं होतं.

त्यावर अनेकदा अक्षयने सफाईही दिली होती. हिंदुस्थानच आपल्यासाठी सगळं काही आहे. मी जे काही कमावलंय, ते इथे राहूनच कमावलं आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्याची परतफेड करण्याची संधी मला मिळाली आहे. जेव्हा लोकं माझ्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, तेव्हा मला वाईट वाटतं. त्यांना नेमकी परिस्थिती काहीच माहीत नसते. ते नेहमी एखाद्याला बोलण्याची संधी शोधत असतात, असं अक्षय म्हणाला होता. आता मात्र या ट्रोलर्सना देण्यासाठीचं उत्तर अक्षयला मिळालं आहे. नागरिकत्व मिळाल्याचा फोटो शेअर करून त्याखाली अक्षयने मन आणि नागरिकत्व, दोन्ही हिंदुस्थानी अशी कॅप्शन दिली आहे.