ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्याची धमकी, सरकारी निवासस्थान केले खाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना काल रात्री उशिरा कॅनबेरा येथील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढण्यात आले. पंतप्रधानांच्या निवासस्थानात बॉम्ब ठेवण्याची धमकी देणारा फोन कॉल आल्यानंतर कॅनबेरा पोलिसांनी कारवाई केली. यानंतर पोलिसांनी परिसराला घेराव घातला असून, पंतप्रधानांच्या निवासस्थानावर तपास पथके पुढील तपास करत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार असतानाच बॉम्बची ही धमकी आली आहे.

एसबीएस न्यूजनुसार स्थानिक पोलिसांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पंतप्रधान अल्बानीज यांना ताबडतोब निवासस्थानातून बाहेर काढण्यात आलेआणि सुरक्षित ठिकाणी हलवले.

मार्च २०२५ मध्ये देखील अल्बानीजला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेप्रकरणी ऑस्ट्रेलियन पोलिसांनी एका ३६ वर्षीय व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की धमकी देणारा व्यक्ती ड्रग्जचे सेवन करणारा होता. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून थोड्या अंतरावर एक हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.