
अत्याचारपीडित महिलेच्या जबाबात अनेक विसंगती असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने हे आदेश दिले. पीडिता मानसिक रुग्ण असली तरी तिच्या जबाबात असलेल्या मोठ्या विसंगतींकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे स्पष्ट करत बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीनावर सोडण्याचे आदेश दिले.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या महिलेवर आरोपी तरुणाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने पीडितेने नोंदवलेल्या जबाबांची गांभार्याने तपासणी केली असता यात तफावत आढळून आली. पीडितेने घटनेवेळी आणि गुन्ह्याच्या स्वरूपाबद्दल वारंवार वेगवेगळी विधाने केली होती.
पीडितेच्या मानसिक स्थितीमुळे तिच्या जबाबात काही प्रमाणात गोंधळ असू शकतो, मात्र ज्या प्रकारे विसंगती आढळल्या आहेत, त्या पाहता आरोपीला अधिक काळ कोठडीत ठेवणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने आरोपीला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि काही अटींसह जामीन मंजूर केला. खटला पूर्ण होईपर्यंत पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.



























































