
‘डब्बा ट्रेडिंग’ रॅकेट गुन्हा दाखल करताना चुकीच्या कलमाअंतर्गत आरोप लावण्यात आल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तिघांना दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांनी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांचा जामीन मंजूर केला आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पोलिसांच्या गुन्हे शाखेने कांदिवलीतील एका गृहनिर्माण सोसायटीतील छापा टाकून विरल पारेख, सोहनलाला कुमावत आणि जिगर संघवी यांना अटक केली. या तिघांवर 22 क्लायंटच्या वतीने बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी वेबसाईटचा वापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला. अटकेनंतर दुसऱ्या दिवशी, आरोपींनी वकील मृण्मयी कुलकर्णी यांच्यामार्फत हायकोर्टात धाव घेत अटकेला आणि त्यांच्यावरील आरोपांना आव्हान दिले. त्यांनी असा युक्तिवाद केला की पोलिसांनी त्यांच्यावर फसवणूक आणि विश्वासघात या कलमांखाली चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे, कारण हे गुन्हे वेगळ्या कायद्याच्या कक्षेत येतात. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत तिघांचा जामीन अर्ज मंजूर केला.