जिनिंग कारखान्यातून निर्माण होतेय  बोंड अळी, सूचना न पाळल्यास फौजदारी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | वर्धा

जिनिंग कारखान्यातून उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामधुन गुलाबी बोंड अळी निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कारखान्यांना कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना कृषी विभागानं दिल्या आहेत. तसेच जे कारखाने सुचना पाळणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

वर्ध्या जिल्ह्यामधील देवळी तालुक्यातल्या सेलसुरा येथे पुन्हा बोंड अळीचे पतंग आढळले आहेत. मागील हंगामात कापुस उत्पादक शेतकऱ्यांना जेरीस आणुन बोंड अळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला होता. त्यामुळे बोंड अळीचे पतंग जिल्ह्यात इतरही शेतामध्ये असण्याची शक्यता जिल्हा कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी व्यक्त केली आहे.

पतंग आढळलेल्या मुळे शेतकरी आणि कृषी विभागापूढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी लावलेल्या कामगंध सापळा मध्ये बोंड अळीचे नर पतंग अडकले आहेत. या पतंगाचे प्रमाण काही दिवसात वाढण्याची शक्यता सेलसुरा कृषी विज्ञान केंद्राने वर्तवली आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि जिनिंग कारखानदारांनी आत्ताच सतर्क होऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच कृषी विभाग सतर्क झाला आहे. या अळीचे निर्मिती केंद्र
ठरत असलेल्या जिनिंग अँड प्रेसिंग केंद्राकडे प्रशासनाने लक्ष वेधले असून या कारखान्यांचे सर्वेक्षण केले आहे. कृषी विभागाची पथकं जिल्ह्यात असणाऱ्या जिनिंग अँड प्रेसिंग कारखान्यांना भेटी देऊन पाहणी करीत आहेत .