‘26/11 कसाब आणि मी’ पुस्तकाचे शानदार प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
26-11-terror-attack

सामना प्रतिनिधी । मुंबई

काही लेखकांनी ऐकीव आणि काल्पनिक माहितीच्या आधारे मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यावर पुस्तके लिहिली. पण या प्रकरणातील तपास अधिकारी म्हणून रमेश महाले यांनी या घटनेवर पुस्तक लिहिण्याचे आव्हान समर्थपणे पेलले. या पुस्तकातून त्यांनी मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचे सत्य जगासमोर आणले, अशा शब्दांत पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातील तपास अधिकाऱयांचा गौरव केला.

‘26/11 कसाब आणि मी’ या पुस्तकाचे पडसलगीकर यांच्या हस्ते आज शानदार प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्याला सोमवारी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात या पुस्तक प्रकाशन सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सहपोलीस आयुक्त देवेन भारती हेदेखील यावेळी उपस्थित होते. शहीद तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबला जिवंत पकडणे जितके महत्त्वाचे होते तितकाच या प्रकरणाचा तपास आव्हानात्मक होता. हे आव्हान तपास अधिकारी म्हणून रमेश महाले यांनी लीलया पेलल्याचे पडसलगीकर यावेळी म्हणाले. महाले यांनी 98 अधिकाऱयांना सोबत घेऊन हा तपास पूर्ण केला. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हा होता. तसेच 90 दिवसांत आरोपपत्र दाखल करणे फार कठीण होते, पण महाले यांनी ते सोपे करून दाखवले. त्यांच्या या तपासामुळेच या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता हे आपण जगाला पुराव्यानिशी दाखवू शकलो याकडेही पडसलगीकर यांनी लक्ष वेधले.

100 असूनही आम्ही पांडव होतो

98 पोलीस, राकेश मारिया आणि देवेन भारती असे आम्ही शंभर जण होतो, पण शंभर असूनही आम्ही पांडवांच्या भूमिकेत होतो. त्यामुळे दशतवाद्यांच्या रूपाने आलेल्या कौरवांचा आम्ही पराभव करू शकलो, असे रमेश महाले म्हणाले. एक पुस्तक वाचले. त्यात या हल्ल्याबाबत सत्य लिहिले गेले नव्हते. त्याचा प्रचंड राग आला आणि वास्तव काय आहे ते समोर आणायचे ठरवले. त्यातून या पुस्तकाचा जन्म झाल्याचे महाले म्हणाले.

महालेंनी सेवानिवृत्ती घ्यायला नको होती
महाले यांनी पोलीस दलातून सेवानिवृत्ती घ्यायला नको होती. त्यांना हा निर्णय घेण्यापासून आपण थांबवू शकलो नाही याची खंत असल्याते देवेन भारती म्हणाले. तसेच मुंबईवर हल्ला झाला तेव्हा दत्ता पडसलगीकर गुप्तचर यंत्रणेत कर्तव्यावर होते. त्यावेळी आपण शत्रूचा सामना करत होतो. तेव्हा पहिला फोन पडसलगीकर यांचा आला आणि त्यांनीच हा पाकिस्तानचा हल्ला असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही सतर्प झालो. आज त्याच अधिकाऱयाच्या हस्ते महाले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. हा चांगला योगायोग असल्याचे भारती म्हणाले.