परिपक्व आत्मकथा

>> अरविंद दोडे

दलित आत्मकथनांचे दालन दिवसेंदिवस समृद्ध होताना दिसते आहे. प्रा. प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणींचे पक्षी’पासून सुरू झालेली ही आत्मयात्रा सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन थांबली आहे. कदाचित भवितव्यात ती अधिक बांधीव आणि रेखीव रूपात समोर येईल. ‘उचल्या’ हे गाजले. मधला काही काळ, सुनासुना केला. संघर्ष संपला नाही. ‘उठाव’ ही कादंबरी आली आणि आता उचल्याचा पुढील भाग म्हणून ‘उचल्या’नंतर हा आत्मकथेचा अधिक परिपक्व नायक पुन्हा संघर्ष करताना भेटतो. चरित्र आणि आत्मचरित्राचा प्रमुख गुण म्हणजे सत्यता आणि प्रामाणिकता. हे दोन्ही गुण यात आहेत.

1988 मध्ये ‘उचल्या’ आले आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. साठीनंतर वयाच्या दुसऱया टप्प्यावर ‘उचल्या’नंतर हेसुद्धा स्फोटक आहे. अवघड जीवनप्रवासाच्या काटेरी वाटा आणि वळणे पाहता अस्तित्वाचा संघर्ष कसा नि किती जीवघेणा असतो, याचा प्रत्यय येतो. वेगवेगळ्या पातळ्यांवरील अनुभव प्रापंचिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीतील स्वकीयांचे हेवेदावे अत्यंत परखडपणे शब्दबद्ध केले आहेत. वाचकांस अस्वस्थ करणारे प्रसंग आणि सत्यस्वरूपाच्या जाणिवांनी कासावीस होणारा नायक मनात घर करून बसतो. एक तर भटक्या – विमुक्तांना न्यायासाठी सतत लढा द्यावा लागत असल्याने यश कमी आणि अपमानच अधिक! विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेला समाजसेवक

प्रस्तुत पुस्तकात उचल्यानंतर अनेक स्थित्यंतरे लेखकाच्या आयुष्यात आली. पुरस्कार आमंत्रणे, निवडणुका, सत्कार, देशप्रवास, महाश्वेता देवी, मुंबई (याआधी लातूर), समित्यांचे अनुभव ही प्रकरणे त्यांचा यशाचा चढता आलेख असला तरी पावलोपावली व्यथावेदना, दगाबाजी, धोके यांतून तावून सुलाखून निघणे हेच कसोटीचे क्षण, अतिशय ओघवत्या शैलीत, पाल्हाळ टाळून मांडले आहेत.

किशोर काळे हे एक अंधार प्रकरण त्यांनी म्हणजे लक्ष्मण गायकवाड यांनी कसे सहन केले, हा प्रश्न पडतो. पारिवारिक दुःखांशी दोन हात करता करता, मुंबईतील भटक्यांचे प्रश्न सोडवताना काय काय भोगावे लागते, हे वाचून अंगार काटा येतो. अभिजनांचे प्रश्न वेगळे, बहुजनांचे वेगळे. ही दरी वेगळेपणाची हजारो वर्षांपासून कायम आहे. गावकुसाबाहेरचे जिणे आताशा अशा आत्मकथनांमुळे थोडेफार समजले आहे, त्यांचे ‘हॉटेल’, सिनेमा, पोलीस स्टेशन, चळवळी. लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रस्तावना अभ्यासपूर्ण असून निळय़ापांढऱया रंगातील मुखपृष्ठ (सतीश खानविलकर) समर्पक आहे.

‘उचल्या’नंतर / आत्मकथन

लेखक ः लक्ष्मण गायकवाड

प्रकाशक ः संधिकाल प्रकाशन,

पृष्ठs ः 192, मूल्य ः रुपये 250/-

 

आपली प्रतिक्रिया द्या