मनोवेधक नाट्य समीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अस्मिता प्रदीप येंडे

जयवंत दळवी हे मराठी साहित्यातील एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व होते. जयवंत दळवी केवळ स्वप्नभूमीत रमणारे साहित्यिक नव्हते, तर त्यांच्या सर्जनशीलतेची भूमी वास्तव होती. ज्यांच्या नाटकामुळे मराठी रंगभूमीला नवे चैतन्य लाभले असा, ललितमधून मराठी सारस्वतांना नाजूक चिमटे घेणारा ठणठणपाळ!

संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्यास्त, कालचक्र, नातीगोती, पुरुष ही त्यांची आजही रसिकप्रिय असणारी नाटके. दळवींची बॅरिस्टर, संध्याछाया, सावित्री, नातीगोती, कालचक्र ही नाटके माणसामाणसांतील गहिरे भावजीवन उलगडून दाखवतात, तर सूर्यास्त, पर्याय, लग्न अशा नाटकांतून त्यांची समाजाभिमुखता जाणवते. जबरदस्त ताकदीच्या व्यक्तिरेखा हे दळवींच्या नाटकांचे वैशिष्टय़! दोन भिन्न स्तरांवरच्या जोडप्यांच्या सुखदुःखांचा शोध त्यांनी ‘महासागर’मध्ये घेतला, तर स्त्री-पुरुषांतील तफावतीचे व अहंकाराचे आणि मदांध राजसत्तेचे दर्शन त्यांनी ‘पुरुष’मधून घडवले.

जयवंत दळवी यांच्या नाटकांतून मनोविकृती, वेड, आत्महत्या, लैंगिक अतृप्ती, अकाली मृत्यू, वृद्धत्व, एकाकीपण, अनैतिक संबंध, वासना इत्यादी विषय मांडले गेले. व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो. व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व यातील महत्त्वाचा भाग म्हणजे मन. त्याचाही विचार करायला हवा. प्रा. विजया पंडितराव लिखित ‘मनी-मानसी – जयवंत दळवींच्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांचा मागोवा’ हे पुस्तक एक वेगळाच दृष्टिकोन घेऊन वाचकांपुढे आले आहे. नाटकाची समीक्षा आपण वाचली असेल, पण नाटकातील स्त्री पात्रांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेला मागोवा, त्या स्त्री पात्रांची मानसिक चिकित्सा या पुस्तकातून मांडली आहे. लेखिकेने जयवंत दळवींच्या एकूण नाट्य लेखनातील 1973 ते 1998 या कालखंडातील त्यांना भावलेल्या नाट्यकृती समोर ठेवून त्यातील फक्त स्त्री पात्रांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सक लेखन केले आहे.

प्रत्येक नाटकातील स्त्री पात्रे ठराविक प्रसंगी अशी का वागतात, त्यांच्या मानसिक स्थितीला कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात, बाकीच्या पात्रांमुळे त्या स्त्री पात्रांच्या मनात आत्महत्येचे विचार का येतात किंवा त्या स्त्री व्यक्तिरेखा आत्महत्या का करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून त्याची उकल या समीक्षेत केलेली दिसून येते. लेखिकेने स्त्री व्यक्तिरेखांच्या मनाशी संवाद साधताना फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाचे सिद्धांतही मांडले आहेत. ‘संध्याछाया’मधील नानी, ‘महासागर’मधील पुतण्याच्या रूपात पतीला शोधणारी गंगू काकी, ‘बॅरिस्टर’मधील बालपणीच वैधव्य आलेल्या अतृप्त कामवासनेपोटी त्रस्त होणारी मावशी, ‘मुक्ता’मधील दिवसा स्वप्नात हरवणारी केशर, ‘पर्याय’मधील पैशांच्या हव्यासापायी स्वतःच्या सुनांचे जीव घ्यायलाही न कचरणारी माई अशा व्यक्तिरेखा वेगवेगळ्या मानसिक स्थितीतून जाताना दिसतात.

दळवींच्या 15 नाट्यकृती समोर ठेवून त्यांची समीक्षा नव्हे, मानसशास्त्रीय समीक्षा मांडली आहे. काहींनी ही नाटके त्या काळी पाहिली असतील, पण आताच्या पिढीला या नाटकांची ओळख व्हावी यादृष्टीने नाटकाची समीक्षा इतक्या व्यवस्थितपणे मांडली आहे की, संपूर्ण नाटक संक्षिप्तरीत्या समजून घेता येते आणि नाटकाचे सारही समजण्यास मदत होते. मानवी मन गुंतागुंतीचे आहे, चंचल आहे. कोण कोणता विचार करील, काही सांगता येत नाही. आजूबाजूला घडणाऱया घटनांचा व्यक्तीच्या मनावर थेट परिणाम होत असतो. हे विचारचक्र माणसाला कुठे आणून सोडेल काही सांगता येत नाही. त्यामुळे मनावर थोडा ताबा मिळवणे किती गरजेचे आहे हे लक्षात येते. मनात नकारात्मक विचार थैमान घालायला लागल्यावर काय करायला हवे, सकारात्मकतेकडे कसे वळले पाहिजे हा विचार करायला ही कलाकृती भाग पाडते. एखाद्या कृतीमागे काहीतरी विचार असतो, हेतू असतो. त्याची चिकित्सा करून अगदी साध्यासोप्या, सहज समजेल अशा शैलीत लेखिकेने ही नाटय़ समीक्षा लिहिली आहे. ‘मनी- मानसी’ हे पुस्तक म्हणजे साहित्यातील ललित कला आणि मानसशास्त्रीय शास्त्रावर आधारित विषय या दोन्हीची सहजसुंदर अशी गुंफण आहे .

सृजन संवाद प्रकाशनाने प्रकाशित केलेल ‘मनी- मानसी’ हे पुस्तक मानवी मनाचा अभ्यासू पद्धतीने घेतलेला वेध आहे. लेखिकेने फक्त व्यक्तीचा नाही, तर ते व्यक्तिमत्त्व आणि त्याची मानसिक जडण-घडण हा धागा पकडून लेखन केले आहे आणि साहित्याला एक वेगळा दृष्टिकोन निर्माण केला आहे. एकूणच ‘मनी-मानसी’ हे पुस्तक वाचून वाचक नक्की मूळ पुस्तकांकडे वळतील अशी खात्री आहे.

मनी-मानसी- नाट्य समीक्षा
लेखिका : प्रा. विजया पंडितराव
प्रकाशक : सृजन संवाद प्रकाशन
मूल्य : रुपये 275/-