अर्थ इतिहासाची विस्तृत मांडणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. जयराज फाटक

सामान्य समजुतीनुसार भूगोलात नकाशांचा अभ्यास केला जातो आणि इतिहासात थोर व्यक्तींचा अभ्यास केला जातो. महाराष्ट्रात इयत्ता चौथीचे इतिहासाचे पुस्तक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रासंबंधी आहे. इतिहास विशेष करून थोर पुरुष, त्यांचे काम आणि त्यांच्या जडणघडणीबाबत लिहिला जातो. सामान्य व्यक्तींची आर्थिक स्थिती, तत्कालीन विज्ञान/तंत्रज्ञान किंवा युद्धांसाठी निधीची कशी जमवाजमव झाली याबाबतचा ऊहापोह इतिहासात क्वचितच आढळतो.

‘मेपिंग इंडिया ग्रेट अगेन, लर्निंग फ्रॉम हिस्टरी’ या मीना आणि राजीवलोचन यांनी लिहिलेल्या पुस्तकात या सर्व बाबींची चर्चा आहे. हिंदुस्थानी शासनाविरुद्ध लढ्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या यशामध्ये आर्थिक मुद्दे किती महत्त्वाचे होते याचा ऊहापोह या पुस्तकात आहे. पहिल्या महायुद्धात इंग्लंडचे पंतप्रधान असणारे लॉइड जॉर्ज यांचे एक सुरेख वाक्य आहे- ‘शासन म्हणजे वित्त.’ प्रस्तुत पुस्तक वाचण्याआधी माझी समजूत होती की उपरोक्त वाक्य केवळ आधुनिक काळात लागू पडते, पण प्राचीन आणि मध्ययुगीन शासनांसाठी देखील वित्त तेवढेच महत्त्वाचे होते हे या पुस्तकातून प्रतीत होते.

मोगल शासनाचे वित्तीय व्यवस्थापन चांगले नव्हते आणि ते सैन्याला पगार वेळेवर देत नसत. मोगलाईन व्यापाऱ्यांना शासनाचे संरक्षण नव्हते आणि व्यापारासाठी ठोस पाठिंबाही नव्हता. त्यामुळे नाईलाजाने हिंदुस्थानी व्यापाऱ्यांना ईस्ट इंडिया कंपनीशी हातमिळवणी करावी लागली, असे स्पष्टीकरण प्रस्तुत पुस्तकात आहे.

व्यापाऱ्यांना शासनाचा पाठिंबा लागतो. बंगालमध्ये बँकर माणिकचंद यांना नवाब मुर्शीद कुली खान यांचे संपूर्ण संरक्षण होते आणि जेव्हा मुर्शीद कुली खान ढाक्यातून मर्शीदाबाद येथे स्थानांतरित झाले तेव्हा माणिकचंददेखील त्याचे बरोबर गेले. या कुटुंबास नंतर ‘जगत शेठ’ असाही किताब देण्यात आला. माणिकचंद यांचे वंशज मेहताब राय यांना शासनाशी चांगले संबंध ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे समजले नाही. तसेच सुशासन, व्यापार आणि आर्थिक प्रगती कशी जोडलेली आहे हेही उमजले नाही.

प्रस्तुत पुस्तकात प्राचीन हिंदुस्थानात किती कौशल्याने वूट्झ पोलाद तयार होत असे याचे वर्णन आहे. वराहमिहीर यांनी लिहिलेल्या ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात या पोलादाबद्दल माहिती मिळते. वूट्झ पोलादाचा वापर दमास्कस येथे तलवारी तयार करण्यासाठी होत असे आणि हे पोलाद विश्वविख्यात होते. आपल्या हिंदुस्थानात टाटा स्टील कंपनीने किती अवघड परिस्थितीत जमशेदपूर येथे पोलाद कारखाना उभा केला याचे सुरेख विवेचन सदर पुस्तकात आहे. युद्ध जिंकण्यासाठी शस्त्र पुरेशी नसतात. जालना जिल्ह्यातील असई या ठिकाणी 1803 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठ्यांमध्ये झालेल्या लढाईनंतर मराठा साम्राज्याची अधोगती सुरू झाली. पुढच्या काळात ‘ड्युक ऑफ वेलिंग्टन’ या नावाने विख्यात झालेला आर्थर वेलस्ली इंग्रजांचे सेनापती होते, तर मराठा सैन्याचे नेतृत्व शिंदे आणि भोसले यांच्याकडे होते. मराठे अतिशय शौर्याने लढले. त्यांचा तोफखानाही उत्तम होता, पण कूटनीतीत आणि रणनीतीत कंपनीने त्यांना मात दिली. पुस्तक वर्णन करते की, मराठी सैन्यातील ब्रिटिश आणि युरोपियन अधिकाऱ्यांना विविध प्रलोभने दाखवून आणि दडपणे आणून पंपनीने स्वतःकडे वळवून घेतले. मराठ्यांकडे तोफखाना होता, पण तो वापरण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित सैन्य दल नव्हते.

हिंदुस्थान हा एक समृद्ध देश होता आणि आपल्याकडे खाण्या-पिण्याची रेलचेल होती. इंग्रज अर्थशास्त्रज्ञ अॅगस मॅडिसन म्हणतात की, औद्योगिक क्रांतीपूर्व सर्व जगाचे दरडोई उत्पन्न 400 डॉलर्स होते. या दरडोई उत्पन्नात प्रत्येकाला पुरेसे अन्न मिळत असे आणि लोक सुखी होते.

हिंदुस्थानात ज्ञानाचा अभाव नव्हता. हिंदुस्थानी गणितज्ञ जगात श्रेष्ठ होते. भूमितीचा वापर करून विशाल मंदिरे निर्माण करण्यात आली, पण हे ज्ञान कालांतराने लुप्त पावले. चांगल्या संस्थाद्वारे ज्ञानेचे जतन न झाल्याने एका पिढीचे ज्ञान दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाले नाही. वूट्झ पोलाद, गणित आणि नाकाचा आकार पुनर्निर्मित करण्याच्या शस्त्रक्रिया असे ज्ञान आपण विसरून गेलो.

सदर पुस्तकात शेवटी हिंदुस्थानास पुन्हा समृद्ध करण्यासाठी काय केले पाहिजे यावर विवेचन केले आहे. सुदृढ संस्थांची उभारणी, माहितीचे व्यवस्थापन आणि माहितीच्या आधारावर निर्णय घेणारा एक ज्ञानाधारीत समाज निर्माण केल्यास हिंदुस्थान पुन्हा महान होऊ शकतो.

उपरोक्त पुस्तक अनेक वर्षांच्या संशोधनाचे फळ आहे. यात कोणतेही अपरिपक्व विचार नाहीत. प्रत्येक मुद्दयाचा ठोस पुरावा देण्यात आला आहे. प्राचीन काळातल्या कोणत्या चुकांमुळे आपला देश दरिद्री झाला. या विवेचनानंतर या पुस्तकात आता आपण पूर्वीचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी काय केले पाहिजे, यावर सोदाहरण सूचना अंतर्भूत आहेत.

‘मेकिंग इंडिया ग्रेट अगेन; लर्निंग फ्रॉम हिस्टरी’

लेखक : मीता आणि राजीवलोचन
संपादक : मनोहर बुक्स, नवी दिल्ली
पृष्ठ : 200, मूल्य : रुपये 320/-