परीक्षण – भावनांचा सुंदर परिमळ

>> अस्मिता प्रदीप येंडे

चैत्र महिना म्हणजे मराठी नववर्षाचे आगमन. आपण तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. चैत्र महिना सुरू झाला की संपूर्ण निसर्ग नव्याने फुलू लागतो. झाडांना नवी पालवी फुटते. निसर्गात नवचैतन्य पसरते. सर्व सृष्टी बहरून जाते नाही का!
अशीच ‘चैत्रपालवी’ पुस्तकाद्वारे आपल्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आली आहे. ज्येष्ठ कवयित्री-लेखिका शकुंतला चौधरी लिखित ‘चैत्रपालवी’ हा ललित लेखसंग्रह म्हणजे त्यांच्या मनातील भावभावनांचा परिमळ आहे. त्या भावनांना कुठेही कृत्रिमता नाही. जे आहे ते अगदी निर्मळ अनुभवांची चैत्रपालवी आहे. शारदा प्रकाशनाने हा लेखसंग्रह प्रकाशित केला आहे.

ज्येष्ठ कवयित्री-लेखिका शकुंतला चौधरी या लेखनासोबत विविध ठिकाणी जाऊन कथाकथन करतात. वैविध्यपूर्ण वाचनामुळे साहित्यक्षेत्राकडे त्यांचा ओढा आहे. तसेच त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

‘चैत्रपालवी’ या लेखसंग्रहात 12 लेख आहेत. प्रत्येक लेख म्हणजे अनुभवांची नवीन पालवीच आहे. त्यात वाचक आपोआप रमत जाईल, हे नक्की. या पुस्तकातील लेख वाचताना आपल्याला आपल्या आयुष्यातील काही प्रसंग, आठवणी डोळ्यासमोर तरळतील. ललितलेखनामध्ये कुठेच कल्पनाविष्काराला जागा नाही. स्वानुभवाचे ते बोल असतात आणि आठवणींचं गाठोडं असतं, जे आपल्या शब्दांतून कागदावर उमटलेले असते.

‘एक सुखद स्पर्श-रिव्हर टच’ या लेखात ‘सन्मित्र ज्येष्ठ नागरिक संघ ठाणे’ तर्फे आयोजित केलेल्या वर्षा सहलीचे वर्णन यात केले आहे. घरातून निघाल्यापासून बसमधील प्रवास, रिव्हर टच रिसॉर्टवरील गमतीजमती, खेळ, गप्पा यामध्ये गेलेला वेळ, प्रवासातून दिसणारी निसर्गाची विविध रूपं लेखात लेखिकेने सुंदररित्या मांडली आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा हवा. स्वतःसाठी वेळ हवा ना. शहरातील गजबजलेपणा दूर सारून निसर्गरम्य वातावरणात घालवलेल्या क्षणांची अनुभूती या लेखात मिळते आणि मन आपोआप प्रसन्न होते. देवाने मानवाला बुद्धी दिली. त्या बुद्धीचा उपयोग काही लोक चांगल्या कामासाठी करतात तर काही वाईट कामासाठी करतात. श्रद्धा म्हणजे नेमके काय आणि बुद्धीचा वापर कसा करावा, हे उदाहरणासहित या लेखात लेखिकेने सांगितले आहे.

‘कर्तृत्व महिलांचे’ या लेखात पुराणातील स्त्रियांपासून ते आताच्या विविध कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख आणि त्यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा या लेखात घेतलेला आहे. ‘डोंबारीण आणि सामान्य गृहिणी’ या लेखात आपल्या मुलांसाठी कष्ट करणारी आई, आपला संसार चालविण्यासाठी वेगवेगळे कसरती करून मुलांचे पोट भरणारी डोंबारीण आणि सामान्य गृहिणी यांची कसरत या लेखात लेखिकेने अगदी हृदयतेने मांडली आहे. स्त्रियांच्या भावविश्वाची ही एक झलक आहे.

नात्यांचे महत्त्व विशद करणारा ‘नाते, ना ते’ हा लेख लेखिकेच्या शब्दसौंदर्यामुळे आणखी खुलले आहे. पाळीव प्राणी हे प्रेमळ असतात. त्यांना जरा प्रेम दिले ना तर तेसुद्धा माणसांना तेवढेच प्रेम देतात. आपल्या आजुबाजूला आपण पाहतोच ना. ‘जडले अबोल नाते 1’ आणि ‘जडले अबोल नाते 2 ’ या दोन्ही लेखांत लेखिकेचे पाळीव कुत्रा टॉमी आणि छोटी मनी म्हणजे मांजर यांच्याशी जडलेलं अबोल नातं या लेखातून लेखिकेने खूप बारकाईने शब्दबद्ध केले आहे. प्राण्यांना बोलता येत नसलं तरी त्यांचं प्रेम बोलकं असतं.

आणखी बरेच विषय या पुस्तकातून व्यक्त झाले आहेत. शारदा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केल्याने हे अनुभव आता फक्त लेखिकेचे न राहता पुस्तक वाचणाऱया वाचकांचे सुद्धा होतील. हे पुस्तक वाचून अनेकांना आपल्या अनुभवांचं स्मरण होईल हे नक्की. पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्रकार सतीश खोत यांनी समर्पक चितारले आहे. नक्की अनुभवा ही ‘चैत्रपालवी’.

आपली प्रतिक्रिया द्या