
>> नमिता दामले
‘सरकुगळू’ या मूळ कन्नड कादंबरीचा मीरा शिराली यांनी ‘माल’ हा मराठी अनुवाद केला त्यावेळी त्यांनी सत्तरी ओलांडली होती. मूळ लेखकाला या कादंबरीच्या प्रकाशनानंतर धमक्यांची पत्रे येत होती. शिराली यांचे हे पुस्तकही डिसेंबर 2017 रोजी म्हणजे 14 वर्षांनी प्रसिद्ध झाले.
कन्नड भाषेतील ‘सरकुगळू’ या शब्दाचा अर्थ आहे विक्रीसाठी तयार असलेला ‘माल.’ केरळमधील कुट्टीचिरा या सागर किनाऱयावरील खेडय़ात घडणाऱया गोष्टीचे मूळ कथाबीज सामाजिक आहे. कुट्टीचिरामधील हाजिम राहत असलेली वस्ती, तेथील वातावरण व तिथून जवळच असलेली उच्चभ्रू वर्गाची वस्ती, सुबत्ता, संस्कृती यांमधील विषमता ही पार्श्वभूमी शेवटपर्यंत कायम असली तरी परिस्थितीप्रमाणे नफीसाच्या स्वप्नांमधील रंग तिच्या भाग्यरेषांमधून वास्तवात आकारतानाचा हा प्रवास आहे.
सैदू कोया, शरीफम्मा, सलीम, जुबेदा यांचे कुटुंब सनातनी व सुधार विचारांच्या सुवर्णमध्यावर स्थिरावलेले आहे. हाजिमच्या सुनेचे कुटुंब मात्र कट्टर सनातनी आहे. येथे परंपरेप्रमाणे मातृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. अशा लोकांचा व्यापाऱयाच्या किंवा इतर निमित्ताने कल्लिकोटेमध्ये होणारा प्रवास आणि वस्तीतील स्त्रियांशी त्यांचा चोरून होणारा निकाह या कथानकाचा केंद्रबिंदू आहे.
आपली धाकटी मुलगी नफिसा गावातीलच एखाद्या बऱ्या घरात नांदावी यासाठी हाजिम आपली सर्व इच्छाशक्ती पणाला लावते. मामुटीला बहिणीचे कल्याण करायचे आहे, पण काही योग जुळून येत नाही आणि गरिबीमुळे सासरी काडीचाही मान मिळत नाही म्हणून त्याची घुसमट होत राहते. शांत, संयमी, सद्वर्तनी नफिसाला परिस्थितीचे भान आहे. सलीमची बदलत जाणारी मानसिकता संपूर्ण कथानकाला अनपेक्षित कलाटणी देते. चोरून निकाह लावणाऱ्या, शरीयतचे नियम न पाळता आपल्या मुलांना वाऱयावर सोडून जाणाऱया अरबांमधील पाप-पुण्याची चाड ही सत्याशी किती प्रामाणिक आहे हा जरी अभ्यासाचा विषय असला तरी ‘माल’मधील तथ्य समजून घेण्यासाठी काहीच हरकत नाही.
माल – फकीर मुहम्मद कटपाडी
अनुवाद – मीरा शिराली
प्रकाशक – शब्द पब्लिकेशन, बोरिवली
पृष्ठ – 99 मूल्य – 125 रु.



























































