टेस्लाची बीएमडब्ल्यू, ऑडी, टाटाशी स्पर्धा; बुकिंगला सुरुवात, दिवाळीआधी डिलिव्हरी

अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची कार अखेर हिंदुस्थानात लाँच करण्यात आली आहे. टेस्लाचे वाय मॉडेल लाँच करण्यात आले असून या कारची बुकिंगसुद्धा सुरू करण्यात आली आहे. या कारची किंमत 60 लाख रुपये आहे. यामुळे मार्केटमध्ये या कारची स्पर्धा मर्सिडिज, ऑडी, बीवायडी, टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाई यांसारख्या इलेक्ट्रिक कारशी होईल. मॉडेल वाय कारला दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. यामध्ये लाँग रेंज आरडब्ल्यूडी आणि लाँग रेंज एडब्ल्यूडीचा समावेश आहे. फुल चार्जवर आरडब्ल्यूडीची रेंज 500 किलोमीटर आहे, तर या कारची किंमत 61 लाख 95 हजार 640 रुपये आहे. तसेच एडब्ल्यूडी मॉडलची रेंज 622 किलोमीटर आहे. या कारची किंमत 69 लाख 15 हजार 190 रुपये आहे. या कारला बुकिंग केल्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ग्राहकाला कारची डिलिव्हरी मिळू शकते. या कारमध्ये रियर टचस्क्रीन, अॅडजस्टेबल क्लायमेंट कंट्रोल वेंट्स, सीट पॅकेट, कप होल्डर्स, यूएसबी पोर्टस्, रियर मॅन्युअल ओपनिंग डोर हँडल यांसारखे फिचर्स दिले आहेत.

कार कशी बुक कराल?

टेस्लाची कार बुक करण्यासाठी सर्वात आधी टेस्लाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. या साईटवर ऑर्डर नाऊ ऑप्शन दिसेल. यात मुंबई, दिल्ली, गुरुग्राम असे तीन ऑप्शन दिसतील. कोणतेही एक शहर निवडल्यानंतर 22 हजार 220 रुपये भरून कारला बुकिंग करता येईल. सध्या केवळ मुंबईत कारच्या डीलरशीपचे उद्घाटन करण्यात आले आहे. मुंबईनंतर दिल्ली आणि अन्य शहरांतही टेस्लाचे शोरूम उघडण्याची कंपनीची योजना आहे.

टेस्ला मॉडल वाय आरडब्ल्यूडी

सिंगल इलेक्ट्रिक मोटर, 955 एचपी पॉवर, 420 एनएम टॉर्क, 5 सेकंदांत 100 किमीचा वेग, 201 प्रति तासचा वेग, 575 किमीची सर्टिफाईड रेंज, 11 केडब्ल्यू (एसी) आणि 170 केडब्ल्यू (डीसी)चे चार्जर.

टेस्ला मॉडल वाय एडब्ल्यूडी

डबल इलेक्ट्रिक मोटर, 384 एचपीचे पॉवर, 510 एनएमचे टॉर्क, 4.6 सेकंदांत 100 चा वेग, 217 किलोमीटर प्रति तासचा वेग, 526 सर्टिफाईट रेंज, 11 केडब्ल्यू (एसी) आणि 250 केडब्ल्यू (डीसी) चे चार्जर.