अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांना अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एक हा त्या तरुणीच्या प्रियकराचा मित्र असून दुसरा हा जवळचा परिचित व्यक्ती आहे. त्या दोघांना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार या दहिसर परिसरात राहतात. मंगळवारी सकाळी त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार महिलेने दहिसर पोलीस ठाण्यात केली. महिलेच्या तक्रारीची दखल घेत दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील सहायक निरीक्षक ओम तोतावार यांच्या पथकाने तपास सुरू केला. त्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तयार केले होते. ती मुलगी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी बंगळुरूला बसने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी खोपोली परिसरात सापळा रचून त्या मुलीची सुटका केली.

मुलीला बंगळुरूला नेणाऱया प्रियकराच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांना चौकशीसाठी दहिसर पोलीस ठाण्यात आणले. दहिसर पोलिसांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. तेव्हा धक्कदायक माहिती समोर आली. मुलीच्या परिचित असणाऱया व्यक्तीने गेल्या वर्षी तिला कांदिवली परिसरात नेऊन तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. अपहरण आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली. तर मुलीच्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी ओम तोतावार यांचे पथक एका राज्यात गेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या