वाहतूककोंडीचा बळी! 5 तास ट्रफिक जॅममध्ये रुग्णवाहिका अडकल्याने चिमुकल्याचा मृत्यू

पाच तास ट्रॅफिक जाममध्ये रुग्णवाहिका अडकल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी घडली. रियान शेख असे त्याचे नाव असून वाहतूककोंडीचा पुन्हा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे. रियानच्या मृत्यूमुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मुंबई-अहमदाबाद मार्गावरील दररोज होणारी ट्रफिककोंडी फुटणार तरी केव्हा, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

कुर्ला येथे राहणारा रियान शेख हा आपल्या आईवडिलांसह वसईतील पेल्हार परिसरात आजीकडे आला होता. गुरुवारी तो चौथ्या मजल्यावरून थेट खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला. त्याला नातेवाईकांनी तातडीने जवळच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल केले. पण त्याची प्रकृती खालावत चालल्याने डॉक्टरांनी मोठय़ा हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. दुपारी अडीचच्या सुमारास रुग्णवाहिकेतून रियानला मुंबईतील रुग्णालयात नेण्यात येत होते.

मुंबई-अहमदाबाद मार्गावरून मुंबईच्या दिशेने जात असताना वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल पाच तास रखडपट्टी झाल्याने रियानची प्रकृती जास्तच ढासळली. रुग्णवाहिका पुढे जात नसल्याचे बघून त्याला महामार्गावरील ससूनवघर गावात असलेल्या लहान रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी रियानला मृत घोषित केले. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आपल्या पोटच्या गोळय़ाने प्राण गमावल्याचे बघून वडिलांनी हंबरडा फोडला.

दुसरी घटना

ऑगस्ट महिन्यात सफाळे येथे राहणाऱया छाया पुरव यांच्या अंगावर झाड पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करायचे होते. मात्र मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तुफान वाहतूककोंडी झाल्याने सुमारे चार तास रुग्णवाहिका एकाच जागी उभी होती. अखेर पुरव यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रियान शेख या चिमुकल्याचा वाहतूककोंडीमुळे जीव गेला. दीड महिन्यातील ही दुसरी घटना आहे.