ढेकणमोह्यात पाझर तलावात बुडून बालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड तालुक्यातील ढेकणमोहा लगतच्या पाझर तलावात बुडून एका बालकाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत इतर दोघे गंभीर आहेत.

रोहित भागवत देवकते (१०) असे मृत बालकाचे नाव असून प्रविण भगवान देवकते (१५) व रोहन भगवान देवकते (१०) हे दोघेजण गंभीर असून त्यांच्यावर बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी सायंकाळी रोहित देवकते, प्रविण देवकते, रोहन देवकते हे पोहण्यासाठी पाझर तलावावर गेले होते. सुरूवातीला पोहण्यासाठी रोहित आणि रोहन हे तलावात उतरले होते. मात्र साचलेल्या गाळामुळे त्यांना पोहता आले नाही व ते बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी प्रविण याने तलावात उडी घेतली खरी मात्र त्यालाही गाळामुळे पोहता आले नाही. या मुलांच्या आरडाओरड्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली व तिन्हीही बालकांना बाहेर काढले. पैकी रोहित देवकते या बालकाचा उपचारासाठी येत असताना वाटेतच मृत्यू झाला तर प्रविण व रोहन देवकते यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतू या दोघांचीही स्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. अचानक झालेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, रोहित हा भागवत देवकते यांना एकुलता एक मुलगा असून त्याचा मृत्यू झाला आहे तर गंभीर अवस्थेत प्रविण आणि रोहन हे सख्खे भाऊ आहेत.