एका मिसकॉलने केले आयुष्य उद्ध्वस्त, ‘ती’ने केली आत्महत्या

51
सामना ऑनलाईन । भोपाळ
एखाद्या चित्रपटात किंवा क्राईम शोमध्ये शोभेल अशी, फक्त एका मिसकॉलने सुरू झालेल्या प्रेमकथेचा अंत शेवटी ‘ती’च्या आत्महत्येने झाला. ‘ती’ म्हणजे मध्यप्रदेशातल्या इंदुरमधली ३६ वर्षीय अर्चना शर्मा. लग्न होऊन सुखी संसाराची स्वप्न बघणाऱ्या अर्चनाला एक मिसकॉल आला आणि तिचं जीवनच बदलून गेलं. त्या मिसकॉल देणाऱ्या मुलाचं नाव होतं आकाश. अर्चना आणि आकाशमधे हळूहळू फोनवरुन बोलणं वाढत गेलं, आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं, मात्र आकाशच्या मनात वेगळाच प्लॅन शिजत होता. जेव्हा हे सत्य अर्चानाला कळलं तेव्हा तिने गळफास लावून घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशने अर्चनाला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि नंतर त्याने त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. तो तिला ब्लॅकमेल करू लागला. तिच्याकडून नेहमी पैसे उकळू लागला. दिवसेंदिवस आकाशच्या मागण्या वाढतच होत्या. अर्चनाने आकाशविरोधात छेडछाडीची तक्रारही केली होती. कारण आकाशने अर्चनाचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
आकाशाच्या या वागण्यामुळं अर्चना पूर्ण खचली होती. एकीकडे नवरा आणि दुसरीकडे प्रियकर आणि त्याच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या मागण्या हे सांभाळणं अर्चनाला अशक्य झालं होतं. त्यामुळे शेवटी तिनं आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी अर्चनाने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. मात्र त्या अगोदर तिने डायरीमध्ये ४० पानी सुसाईड नोट लिहिली. त्यात तिने आपल्या मृत्युला जबाबदार फक्त आकाशच असल्याचं नमुद केलं. अर्चनाच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला.
दरम्यान, पोलिसांनी आकाश बैस याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या