ब्राझीलचा शानदार विजय, पेरूला 0-4ने हरवले

जागतिक फुटबॉलमधील बलाढय़ देश समजल्या जाणाऱया ब्राझीलने शुक्रवारी पहाटे पार पडलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील लढतीत पेरूवर 4-0 अशा फरकाने दणदणीत विजय संपादन केला. ब्राझीलने सलामीच्या लढतीत वेनेझुएलाला 3-0 असे हरवले होते. आता सलग दुसऱया विजयासह ब्राझीलने सहा गुणांची कमाई केली आहे. बी गटात ब्राझील 6 गुणांसह पहिल्या स्थानावर असून कोलंबिया 4 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. वेनेझुएलाला एक गुणाची कमाई करता आलेली आहे. इक्वेडोर व पेरू यांना अजून खातेही उघडता आलेले नाही.

नेयमारचा 68वा गोल

ब्राझीलसाठी अॅलेक्स सॅण्ड्रोने 12व्या मिनिटाला, नेयमारने 68व्या मिनिटाला, एव्हर्टन रिबेरोने 89व्या मिनिटाला आणि रिचार्लीसनने 93व्या मिनिटाला गोल केले. नेयमारने ब्राझीलचे प्रतिनिधित्व करताना 68वा गोल केला हे विशेष. ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम पेले यांच्या नावावर आहे. त्यांनी 77 गोल केले आहेत. नेयमार या यादीत दुसऱया स्थानावर असून पेले यांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी त्याला आणखी दहा गोलांची गरज आहे.

कोलंबिया-वेनेझुएलामध्ये गोलशून्य बरोबरी

बी गटात आणखी एक लढत पार पडली. कोलंबिया-वेनेझुएला यांच्यात ही लढत झाली. पण या लढतीत दोन्ही संघांकडून एकही गोल करण्यात आला नाही. या लढतीत दोन्ही संघांमध्ये गोलशून्य बरोबरी झाली.

ब्राझील-पेरू लढतीची आकडेवारी

ब्राझील पेरू
गोल 4 0
शॉट 17 7
शॉट ऑन टार्गेट 9 2
बॉलवरील ताबा 55 45
ऑफसाईड 2 0
कॉर्नर्स 2 3
यलो कार्ड 1 3
रेड कार्ड 0 0

आपली प्रतिक्रिया द्या