13 संघ पात्र, अजून 35 बाकी; ब्राझील, इक्वाडोर, ऑस्ट्रेलियाला फिफा वर्ल्ड कपचे तिकीट

फुटबॉल विश्वातील सर्वोच्च स्पर्धा असलेल्या आणि आगामी वर्षी होणार्या फिफा वर्ल्ड कपसाठी आतापर्यंत एकूण 13 संघ पात्र ठरले असून 35 संघांचे भवितव्य सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड कप पात्रता फेरीत ठरेल. आता ब्राझील, इक्वाडोर आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी आपापल्या लढती जिंकून पुढील वर्षी अमेरिकेत रंगणार्या या महासंग्रामासाठी आपले तिकिट बुक केले आहे. गेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये एकूण 32 संघ खेळले होते. तो आकडा आता 48 संघावर नेण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाने सौदी अरेबियावर 2-1 अशी मात करत सलग सहाव्यांदा फिफा वर्ल्ड कपची पात्रता मिळविली. ब्राझीलने विनिशियस ज्युनियरच्या गोलवर पराग्वेला 1-0 ने पराभूत करत आपली जागा पक्की केली.

याचवेळी, गतविजेता अर्जेंटीना आणि कोलंबियामधील सामना बरोबरीत सुटला. अर्जेंटीनाची संघ आधीच पात्रता ठरला आहे. आगामी फिफा वर्ल्ड कपमध्ये 48 संघांचा सहभाग असेल. गतवेळी 2022 वर्ल्ड कपमध्ये 32 संघ खेळले होते.

युरोपमध्ये काँटे की टक्कर

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 48 पैकी 16 संघ युरोपमधून पात्र ठरणार आहेत. सध्या युरोपमधील 54 संघांमध्ये वर्ल्ड कप पात्रता फेरीचे सामने सुरु आहेत. येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत हा संघर्ष सुरू राहिल आणि त्यातून 16 संघ वर्ल्ड कपमध्ये आपले स्थान निश्चित करतील.

कतार, सौदीला अजून संधी

आशिया खंडातील 6 संघांनी वर्ल्ड कपमध्ये आपले स्थान पक्के केले असून अजून तीन जागांसाठी अनेक संघांमध्ये द्वंद्व सुरू आहे. गतयजमान कतार, युएई, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, इराक आणि ओमान या संघांना वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याची अजूनही संधी आहे. दक्षिण अमेरिकेतून अर्जेंटिना, ब्राझील, इक्वाडोर हे तीन संघ पात्र ठरले आहेत आणि उर्वरित 3 स्थानांसाठी उरुग्वे, पॅराग्वे, कोलंबिया, व्हेनेझुएला आणि बोलाविया यांच्यात संघर्ष होईल.

फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेले संघ :

  • उत्तर अमेरिका (एकूण 6) ः अमेरिका, कॅनडा, मेक्सिको
  • युरोप (16)ः 54 देशांमध्ये पात्रता फेरी सुरू
  • आशिया (8)ः जपान, इराण, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, जॉर्डन.
  • ओशियाना (1)ः न्यूझीलंड.
  • दक्षिण अमेरिका (6)ः अर्जेंटिना, ब्राझील, इक्वाडोर.
  • आफ्रिका (9) ः 49 देशांमध्ये पात्रता फेरी सुरू

2 संघ प्ले ऑफ सामन्यांमधून निवडले जातील