
सामना प्रतिनिधी । मुंबई
बच्चे कंपनीला प्रचंड आकर्षण असलेला आकाशपाळणा, मिनी ट्रेन, चकरी, वॉटरटब आणि फिरत्या नावेसह अनेक खेळण्यांची रेलचेल असणाऱया माहीमच्या ऐतिहासिक जत्रोत्सवाला या वर्षी पोलिसांनी ‘सुरक्षे’चे कारण देत परवानगी नाकाल्याने ‘बेक’ लागला आहे. यामुळे आकाशपाळण्यांची वर्षभर आतुरतेने वाट पाहणाऱया बच्चेकंपनीचा हिरमोड झाला असून दररोज होणारा हजारोंचा पारंपरिक व्यवसायही बुडणार आहे.
माहीमच्या बाबा मगदुम दर्गाच्या वार्षिक उरुसाला सुरुवात झाल्यानंतर मुंबईकरांची पावले आपोआपच बाबांच्या दर्शनासाठी वळतात. उरुसानिमित्त मगदुम बाबाच्या दोन जत्रा भरतात. एक दर्ग्याजवळ आणि दुसरी मुख्य रस्त्यालगत. दर्ग्याजवळ भरणाऱया जत्रेत मुख्य आकर्षण असलेल्या आकाशपाळण्यांसह अनेक खेळणी असतात तर दुसऱया जत्रेत खाण्यापिण्यासह लहान-मोठी खेळणी असतात. दर्ग्याजवळ दरवर्षी येथे 5 आकाशपाळणे असतात. या ठिकाणी भरणारा जत्रोत्सवही आबालवृद्धांच्या आकर्षणाचे केंद्र असतो. मात्र या वर्षी सगळय़ा परवानग्या घेऊनही सुरक्षेच्या कारणामुळे आकाशपाळणे सुरू करायला पोलिसांनी मनाई केल्यामुळे या पारंपरिक जत्रोत्सवाला ब्रेक लागला आहे.
आमचा पारंपरिक व्यवसाय बुडणार
आमच्या बापजाद्यापासून आम्ही जत्रेत पाळणे फिरवत आहोत. त्यावेळी छोटे पाळणे होते. मात्र, गेल्या 20 वर्षांपासून आम्ही माहीममध्ये जत्रेवेळी हे आकाशपाळणे फिरवत आहेत. त्यासाठी आवश्यक ती परवानगी आम्ही सगळय़ांकडून मिळवतो. या वर्षीही आम्ही ती मिळवली आहे. या व्यवसायावरच आम्ही आमच्या कुटुंबाचा आणि कामगारांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, परवाना असूनही आकाशपाळणे सुरू न केल्यामुळे आमची, आमच्या कामगारांची उपासमार सुरू आहे, अशी माहिती अब्दुल समद शेख आणि अन्य आकाशपाळणे व्यावसायिकांनी दिली.
दररोज 50 हजारांहून जास्तीचे नुकसान
पाच आकाशपाळणी सुरू नसल्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाचे दरदिवशी 50 हजारांहून जास्तीचे नुकसान होत आहे. हाताखालचे 330 कामगार, त्यांचे पगार, जनरेटर्सचे भाडे, ऑपरेटर्सचा पगार यांच्या खर्चाबरोबरच मोठय़ा ट्रक्समधून सामान आणणे, आकाशपाळणे बनवून उभे करणे, या सगळय़ासाठी लाखोंच्या घरात खर्च जातो. आधीच दोन दिवस वाया गेले आहेत. त्यामुळे पाळणे सुरू करायला परवानगी द्यावी आणि जत्रेचे दोन दिवस वाढवून द्यावेत, अशी विनंतीही या व्यावसायिकांनी केली आहे.
आकाशपाळण्यांसाठी परवाना, मग सुरू करायला परवानगी का नाही?
माहीमला जत्रा जिथे सुरू आहे ती जागा बीपीटी आणि कलेक्टरची आहे. त्यासाठी त्यांची एनओसी लागते. त्यानंतर अग्निशमन दल, इलेक्ट्रिक, आरटीओ, स्थानिक पोलीस ठाणे याची परवानगी लागते. ‘पीडब्ल्यूडी’कडून फिटनेस सर्टिफिकेट लागते. मात्र, या सगळय़ा परवानग्या मिळूनही आयत्या वेळी सुरक्षेचे कारण देत आकाशपाळणे सुरू करायला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे आकाशपाळणे व्यावसायिकांनी सांगितले. पोलिसांनीच जत्रेपुरता तात्पुरता परवाना दिला आहे. मग आता आकाशपाळणे सुरू करायला ते परवानगी का देत नाही, असा प्रश्न या व्यावसायिकांनी विचारला आहे.























































