
वारस हक्काची नोंद करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला तलाठय़ासह कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. तलाठी स्वाती बबनराव झुराळे व कोतवाल संदीप लक्ष्मण तांबे (रा. निमगावजाळी, ता. संगमनेर) अशी दोघांची नावे आहेत.
संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे एका तक्रारदाराच्या नातेवाईकाच्या वारस हक्काची नोंद करायची होती. मात्र, रोज नवे कारण सांगून तलाठी नोंद करण्यास टाळाटाळ करीत होत्या. वारस हक्काची नोंद करण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी तलाठी स्वाती झुराळे व कोतवाल संदीप तांबे यांनी तक्रारदाराकडे केली. याबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पथकाने पडताळणी करून शुक्रवारी दुपारी निमगाव जाळी येथील तलाठी कार्यालयात सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले.

























































