पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांना लाच घेताना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पेण

पेण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक विजय गवळी यांना ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. प्रसृतीसाठीच्या शस्त्रक्रियेसाठी महिलेच्या पतीकडून त्यांनी ही लाच मागितली होती. विजय हे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अजित गवळी यांचे बंधू आहेत. अजित गवळी यांनी काही दिवसांपूर्वी भगवान गौतम बुद्धांबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहली होती, या पोस्टमुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या पत्नीची सिझेरिअनद्वारे प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी विजय गवळी यांनी तक्रारदाराकडे ७ हजार रूपये मागितले होते, तडजोडीअंती ५ हजार रुपये लाच देण्याचं निश्चित झालं. तक्रारदार हा वाहनचालक असल्याने त्याला ही रक्कम लाच म्हणून देणं परवडणारं नव्हतं, यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचं ठरवलं. या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाचे डीवायएसपी विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बकाळे व त्याच्या टीमने खात्री करुन सापळा रचला. पोलीस पथकाने लाच घेताना विजय गवळी यांना अलगद उचलला आणि अटक केली. नैसर्गिक प्रसृती शक्य असतानाही सिझेरिअनची गरज आहे असं सांगत गवळी रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. यावेळी गवळी रंगेहाथ सापडले आहेत.