
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अलिबाग तालुक्याला मोठया प्रमाणावर बसला. अलिबागच्या खारेपाटातील बिडवागळे येथील शेताकडे जाणाऱ्या मार्गावरील पूलाचा अर्धा भाग पाण्यात वाहून गेला. त्यामुळे ग्रामस्थांचा शेताकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
बिडवागळे हे गाव कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीत येते. आज सकाळी शेतकरी शेतीच्या कामासाठी निघाले असता पूलाचा अर्धा भाग कोसळून वाहून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुर्डुसचे सरपंच अनंता पाटील, तलाठी वावेकर यांनी ग्रामस्थांसह जावून पूलाची पाहणी केली. या पूलाच्या पलीकडे काही ग्रामस्थांची घरे आहेत. त्याचबरोबर जिल्हा परीषदेचे लघुपाटबंधारे धरण आहे. ग्रामस्थांची शेतीदेखील पलीकडच्या बाजूला आहे. सध्या पाऊस चांगला झाल्याने शेतीच्या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र, पूलाचा काही भाग वाहून गेल्याने शेतावर कसे जायचे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. हा पूल 8 ते 10 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता, असे सरपंच अनंता पाटील यांनी सांगितले. पूलाची तातडीने दुरुस्ती करावी किंवा पर्यायी व्यवस्था करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.




























































