घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी, पवईतील चार पूल पालिका नव्याने बांधणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी आणि पवई येथील चार पादचारी पूल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अतिधोकादायक ठरल्याने पाडून नव्याने बांधण्यात येणार आहेत तर विक्रोळी पूर्व टागोरनगर आणि पवईतील साकी विहार रोड येथे पालिका नवे पूल बांधणार आहे. या कामासाठी पालिका 7 कोटी 79 लाखांचा खर्च करणार आहे.

अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल 14 मार्च 2019 रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. यामध्ये पालिकेच्या माध्यमातून शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील पुलांची आवश्यक दुरुस्ती तर काही ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहेत. यानुसार स्ट्रक्चरल ऑडिटर मे. स्ट्रक्टवेल डिझायनर्स ऍण्ड कन्सलटंटस् प्रा. लि.ने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये संबंधित चार पूल अतिधोकादायक आढळले होते, तर टागोरनगर विक्रोळी येथे नागरिकांच्या मागणीनुसार तर साकी विहार रोड पवई येथे पावसाळ्यात पूरसदृश स्थिती निर्माण होत असल्यामुळे दोन नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या आगामी महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

 हे पूल नव्याने बांधणार

  • घाटकोपर पश्चिम बर्वेनगर येथे 12 मीटर लांब पादचारी पूल.
  • विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर येथे 20 मीटर पादचारी पूल.
  • पवई रेनेसन्स हॉटेलजवळ 29 मीटर लांब पादचारी पूल.
  • मुलुंड रमाबाई नगर येथे 30 मीटर लांब पादचारी पूल.
  • विक्रोळी पूर्व टागोरनगर येथे 20 लांब पादचारी पूल.
  • घाटकोपर पूर्व-पश्चिमला जोडणारा पूलही बांधणार

घाटकोपर पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या लक्ष्मीबाग नाल्यावरील पूल नव्याने बांधण्यात येणार आहे. या पुलासाठी 19 कोटींचा खर्च करणार आहे. हा पूल अतिधोकादायक ठरल्याने 31 मेपासून पुलावरील जड वाहतूक बंद करण्यात आली असून स्थानिकांच्या मागणीवरून या पुलावरून लोखंडी पुलाचे बांधकाम करून तो हलक्या वाहनांसाठी 27 जुलैपासून खुला करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.