आयआयटी, व्हीजेटीआय, पालिकेच्या ‘ग्रीन सिग्नल’नंतरच नवीन पूल बांधणार!

193
bmc-2

पालिकेने नव्याने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेले पूल पुन्हा बांधताना ‘आयआयटी’, ‘व्हीजेटीआय’ आणि पालिकेच्या तज्ज्ञ अभियंत्यांच्या ‘ग्रीन सिग्नल’नंतरच काम सुरू केले जाणार आहे. ‘हिमालय पूल’ ‘गुड कंडिशन’मध्ये असल्याचा रिपोर्ट देऊनही दुर्घटना घडल्यामुळे धोका टाळण्यासाठीच पालिकेने हा निर्णय घेतला. दरम्यान, अतिधोकादायक ठरलेल्या पुलांचे बांधकाम ऑक्टोबरपासून सुरू केले जाणार आहे.

मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने धोकादायक पुलांची दुरुस्ती क पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. शहरातील पादचारी आणि रेल्के पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर 29 पूल अतिधोकादायक असल्याचे समोर आले होते तर अनेक पुलांची दुरुस्ती सुचकण्यात आली. यामधील अतिधोकादायक आठ पूल पाडण्यात आले असून दुरुस्ती सुचवलेल्या पुलांचे काम करण्यात आले आहे. दुरुस्ती करण्यात येणाऱया पुलांवरील ‘भार’ कमी करण्याचा निर्णयही घेतला आहे.

असे होणार काम

नवीन पुलांच्या बांधकामाआधी कंत्राटदाराकडून डिझाईन घेतले जाईल. या डिझाईनची पडताळणी आयआयटी, व्हीजेटीआय आणि पालिकेच्या तज्ञ अभियंत्यांकडून करून घेण्यात येईल. यामध्ये कंत्राटदाराने सादर केलेला आराखडा प्रवाशांच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने योग्य वाटला तरच ‘वर्क ऑर्डर’ दिली जाणार आहे.

…तर कंत्राटदारांना बक्षिस

पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी होणाऱया काही प्रकल्पांमध्ये कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे कामाला विलंब होतो. यामुळे मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी आणि काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी पालिकेने नवी शक्कल लढवली आहे. यामध्ये वेळेआधी पुलाचे बांधकाम पूर्ण करणाऱया कंत्राटदाराला कामाच्या एकूण रकमेच्या 0.1 टक्के रक्कम कामाचा निर्धारित कालावधी पूर्ण होईपर्यंत प्रतिदिन बक्षिस म्हणून दिली जाईल, तर विलंब झाल्यास प्रतिदिन 0.2 टक्के दंड आकारला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या