लेख – हॉर्मुझमधील नौदल संघर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<< ब्रिगेडियर हेमंत महाजन >>>
[email protected]

इराण-अमेरिका संघर्षात अरबी आखात आणि हॉर्मुझ रस्ता (Strait of Hormuz) हा नौदल आणि राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनला आहे. यासंदर्भात अमेरिकेच्या नौदलाचा, विशेषतः विमानवाहक युद्धनौकांचा (aircraft carrier) वापर आणि इराणचा ‘गनिमी कावा’ व लहान वेगवान नावांच्या रणनीतीचे विश्लेषण, तसेच आखाती नौदलांची भूमिका आणि त्यातून मिळणारे युद्धाचे धडे यावर विश्लेषण अत्यंत गरजेचे आहे.

अमेरिकन नौदलाचा मुख्य आधार हा अनेक विमानवाहक युद्धनौकाआधारित स्ट्राईक ग्रुप्स (carrier strike groups) आहेत. या वेळी यूएसएनच्या अनेक सुपरकॅरियर्स-जसे की, यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड, यूएसएस अब्राहम लिंकन आणि यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश. यांना इराणजवळच्या पाण्यात तैनात करण्यात आले आहे, जिथून त्यांची विमाने इराणच्या लष्करी आधार, रॉकेट/मिसाईल साइट्स आणि नौदल सुविधांवर हल्ले चढवू शकतात.

या नौसेनेची भूमिका फक्त हल्ला करण्याची नसून अरबी आखातातील मित्रराष्ट्रांना सुरक्षा देण्याचीही आहे. विमानवाहक नौका ही एक भ्रमणशील/ हलणारे विमानतळ म्हणून वापरली जाते, जिथून फायटर जेट्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर विमाने, AWACS आणि स्ट्राईक ड्रोन यांच्या माध्यमातून वायुसेना, नौसेनेचा एकत्रित दबाव टाकता येतो. त्यामुळे अमेरिकेला दूरवर फायर करण्याची क्षमता मिळते.

हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि पर्शियन आखात क्षेत्रात संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि बहारीन यांसारख्या देशांचे नौदल तैनात आहे. मात्र, या संघर्षात त्यांची भूमिका प्रामुख्याने ‘सहकार्यात्मक आणि संरक्षणात्मक’ राहिली आहे. हे देश अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय नौदलांना नियमित रसद पुरवतात. त्यांच्या हवाई तळांचा आणि बंदरांचा उपयोग अमेरिकन ’सुपर-कॅरिअर्स’साठी लॉजिस्टिक हब म्हणून केला जातो. त्यांनी आपली किनारपट्टी संरक्षण प्रणाली अधिक सक्षम केली आहे. इराणकडून येणाऱ्या छोट्या नौकांच्या धोक्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे देश सातत्याने गस्त घालतात. या देशांच्या नौदलांनी इराणविरुद्धच्या थेट मोठ्या लष्करी कारवायांमध्ये सहभाग घेण्याचे टाळले असून त्यांचे लक्ष केवळ व्यापारी मार्गांच्या सुरक्षेवर केंद्रित आहे.

इराणकडे अमेरिकेसारख्या महाकाय युद्धनौका नसल्या तरी त्यांनी हॉर्मुझच्या क्षेत्रात ‘असममित युद्धनीती’ (Asymmetric Warfare) अवलंबली आहे. इराणचे ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ आणि इराणची नेव्ही यांच्याकडे शेकडो ‘स्पीड बोट्स’ आहेत. या नौका आकाराने लहान असल्या तरी त्या मशीनगन्स, रॉकेट लॉन्चर्स आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत.

‘स्वार्म अटॅक’ (झुंडीचे हल्ले) आणि इराणची रणनीती ः इराणच्या रणनीतीचा मुख्य उद्देश अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय युद्धनौकांना दबावाखाली ठेवणे हा आहे. इराणच्या या वेगवान नौका आंतरराष्ट्रीय जहाजांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतात किंवा त्यांच्या अगदी जवळ जाऊन चिथावणीखोर हालचाली करतात.

झुंडीचे हल्ले : या युद्धतंत्रात अनेक छोट्या नौका एकत्र येऊन एका मोठ्या युद्धनौकेला चहूबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी मोठ्या युद्धनौकेला आपली संरक्षक यंत्रणा, गोळीबार किंवा ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’चा वापर करावा लागतो.

या छुप्या युद्धामुळे केवळ भौतिक नुकसानच नाही, तर मानसिक तणाव निर्माण करून जागतिक अर्थव्यवस्थेला खीळ घालण्याचा प्रयत्न इराणकडून केला जातो.

हॉर्मुझ मार्ग जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या चोक पॉइंट्सपैकी एक आहे. कारण त्यातून जगातील 20 टक्के इतके कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू जातात. समुद्रामधील ‘चोक पॉइंट’ (Choke Point) ही संकल्पना जागतिक व्यापार आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. हा एक असा अरुंद समुद्री मार्ग असतो जिथून जहाजांची ये-जा मोठ्या प्रमाणात होते, पण तो मार्ग इतका अरुंद असतो की, तो सहजपणे रोखला जाऊ शकतो.
ज्याप्रमाणे रस्त्यावरील एखादा अरुंद पूल किंवा बोगदा बंद पडल्यास संपूर्ण वाहतूक ठप्प होते तसेच समुद्रात काही नैसर्गिक अरुंद मार्ग असतात. दोन मोठ्या जलमार्गांना जोडणाऱ्या या अरुंद पट्ट्याला ‘सामुद्रधुनी’ (Strait) किंवा ‘चोक पॉइंट’ म्हणतात. जर हा छोटा मार्ग बंद झाला तर जहाजांना हजारो मैलांचा वळसा घालून जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि इंधनाचा खर्च प्रचंड वाढतो.

फक्त 21 मैल रुंदीचा हा समुद्रमार्ग जगातील तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काही तेल वाहतूक जहाजे हानीग्रस्त झाली, विमा खर्च वाढले आणि व्यापारी जहाजे अडकली. युद्धनीतीमध्ये चोक पॉइंटवर नियंत्रण मिळवणे म्हणजे संपूर्ण जगाची ‘लाईफलाइन’ कापण्यासारखे असते. इराण आणि पश्चिम आशियातील तणावात ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ हा जगातील सर्वात धोकादायक चोक पॉइंट बनला आहे. इराण या अरुंद मार्गाच्या अगदी काठावर वसलेला आहे.

जेव्हा जेव्हा अमेरिका किंवा पाश्चात्य देशांकडून इराणवर निर्बंध लादले जातात किंवा लष्करी दबाव वाढतो, तेव्हा इराण ’हॉर्मुझची सामुद्रधुनी’ बंद करण्याची धमकी देतो. जागतिक व्यापारावर परिणाम करून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी किंवा दबाव टाकण्यासाठी चोक पॉइंटचा वापर ‘स्ट्रॅटेजिक वेपन’ म्हणून केला जातो. थोडक्यात, चोक पॉइंट हे समुद्रातील असे ‘गळा आवळण्याचे’ ठिकाण आहेत, ज्याचा ताबा ज्याच्याकडे असेल तो जागतिक अर्थव्यवस्था आणि युद्धभूमीवर वरचढ ठरू शकतो.

सध्याच्या संघर्षात इराणने अनेक व्यापारी जहाजांवर लहानमोठे हल्ले केले आहेत आणि धमक्याही दिल्या आहेत. इराणी वेगवान नौका आणि ड्रोन्स तेलवाहू जहाजांच्या अगदी जवळून घिरट्या घालत भीतीचे वातावरण निर्माण करतात. या प्रकारामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. अनेक वाहतूक कंपन्यांनी आपले सागरी मार्ग बदलले आहेत. हा मार्गबदल तात्पुरता असला तरी त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड आर्थिक आणि राजकीय दबाव निर्माण झाला आहे.

थोडक्यात सांगायचे तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) इराणच्या ‘स्पीड बोट्स’ तंत्रज्ञानाने जहाजांचे नुकसान करून आणि भीतीचे वातावरण निर्माण करून जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का दिला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, भविष्यातील नौदलाच्या लढायांमध्ये ‘चोक पॉइंट नाकेबंदी’ आणि ‘ड्रोन-बोट युद्ध’ हे मुख्य तंत्र बनणार आहेत.