गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे मोठय़ा मंडळांच्या तयारीला सुरुवात झाली असून मुंबईबाहेरील गणेशमूर्तींचे मंडपाकडे आगमनही सुरू झाले आहे. त्यामुळे मंडप परवान्यासाठी सुट्टीच्या दिवशीही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ठेवा, अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सुमारे 12 हजारांवर आहेत. मंडळांना 6 ऑगस्टपासून मंडप मंजुरीसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही विभागात ही प्रक्रिया उशिरा सुरू झाली. गणेशोत्सव 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गणेशोत्सवापूर्वी श्री गणेशाचे आगमन मंडपात 11 ऑगस्टपासून होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेकडून सादर केलेला परवाना अर्ज पोलीस, वाहतूक, अग्निशमन दल या विभागांकडे ऑनलाइन अर्ज सादर होणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने 24 जुलै 2015 रोजी मंडप परवान्यासाठी निर्गमित केलेल्या धोरणाप्रमाणे उत्सवापूर्वी एक महिना अगोदर मंडप परवानगी प्रक्रिया चालू होणे आवश्यक आहे. तसेच धोरणामध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियेला वेळ लागत असल्याने सुट्टीच्या दिवशी पालिकेचे कार्यालय चालू राहून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होईल. मंडळांना वेळेवर मंडप घालण्याची परवानगी मिळेल आणि त्या नंतर मंडळांना वीजबत्ती व मंडप डेकोरेशनला वेळ मिळेल, अशी मागणी समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांना निवेदन दिले आहे.