
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मारहाणीत मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी मृत बाळासाहेब सरवदे यांची मुलगी त्रिशा हिने ‘माझे पप्पा मला आणून द्या,’ असा आर्त टाहो फोडला. त्यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले.
मृत बाळासाहेब सरवदे यांच्या पश्चात पत्नी वंदना आणि दोन मुली आहेत. कुटुंबाचा आधारच गेल्याने सरवदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुली लहान असल्याने त्यांच्या भविष्याचे काय, असा प्रश्न अनेकांच्या समोर उपस्थित राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी पत्नी वंदना आणि मुलींचा आक्रोश पाहून ठाकरेंनाही रडू कोसळले.
मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी
राजकीय भांडणातून बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला असून, त्यांना न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले. तसेच मनसेचा सैनिक गेला आहे. तो आमच्या कुटुंबातीलच आहे. त्यामुळे सरवदे यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आता आमची असल्याचेही अमित ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.




























































