
दुधात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर मकोकाअंतर्गत कारवाई करा, या मागणीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले. अखेर दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
अंधेरी परिसरात भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत असल्याबाबत आमदार मनिषा कायंदे यांनी तारांकित प्रश्न विचारला. फूड इन्स्पेक्टरची पदे मोठय़ा प्रमाणावर रिक्त असल्यामुळे भेसळ रोखण्याचे काम प्रभावीपणे होत नसल्याची वस्तुस्थितीदेखील त्यांनी मांडली. त्यावर मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, वर्सोवा नवजितनगर येथे छापा टाकला असता अमुल आणि गोकुळ ब्रँडच्या पिशव्या फोडून आणि त्यात भेसळ करून विकल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतीत 14 लोकांवर गुन्हे दाखल केले असून चार जणांवर तडीपारीची कार्यवाही सुरू आहे.
फूड इन्स्पेक्टर भरतीसंदर्भात मंत्री झिरवाळ म्हणाले, आकृतीबंधानुसार 2544 पदे अपेक्षित आहेत, तर त्याच्यात 1273 पदे आपल्याला अजून वाढ करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने वित्त विभागाकडे फाईल दिलेली होती. पण काही त्रुटी काढून ती फाईल रिटर्न आलेली आहे. मात्र लवकरात लवकर ती पदभरतीची कार्यवाही केली जाईल. तसेच मागच्या काही काळात 197 लोकांची नव्याने भरती केली आहे. त्यांचे ट्रेनिंग घेऊन आता त्यांना पदस्थापनादेखील देण्यात आलेली आहे.
भेसळचा गुन्हा हा ड्रग्जपेक्षा कमी आहे का?
दुधातील भेसळ ही संघटित गुन्हेगारी असल्यामुळे याप्रकरणी मकोका लावा, अशी मागणी भाई जगताप यांनी केली असता मकोकाच्या धर्तीवर नवीन कायद्याचा ड्राफ्ट तयार केला असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. त्यावर आक्षेप घेताना ऍड. अनिल परब म्हणाले, दूध ही जीवनावश्यक वस्तू असून दुधातील भेसळ मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. या संघटित गुन्हेगारीवर मकोका का लावत नाही? भेसळचा गुन्हा हा ड्रग्जपेक्षा कमी आहे का? असा सवाल करत ऍड. परब यांनी सरकारला घेरले.




























































