कांदिवलीत बिल्डरवर दिवसाढवळ्या गोळीबार, गोळीबाराचे कारण अस्पष्ट

प्रॉपर्टी डीलरवर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची घटना आज चारकोप परिसरात घडली. फ्रेडी डिमेलो असे जखमीचे नाव आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तिघांपैकी एका शूटरने फ्रेडीवर गोळीबार केला. फ्रेडीच्या छातीवर दोन गोळ्या झाडल्या. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्या दोन गोळय़ा बाहेर काढल्या. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबाराची घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. फ्रेडी हा बंदरोखाडी येथे राहतो. आज दुपारी फ्रेडी हा त्याचा मित्राला भेटण्यासाठी गेला होता. ज्याना भेटण्यासाठी गेला होता, तो तेथे नव्हता. त्यामुळे फ्रेडी हा त्याच्या इतर मित्रांना भेटून पुन्हा गाडीच्या दिशेने जात होता. तेव्हा शाळेच्या बाहेर मोटारसायकलवरून तीन शूटर आले. दोन शूटरनी डोक्यात हेल्मेट घातले होते, तर एका शूटरने चेहरा रुमालाने झाकलेला होता. तिघांपैकी एका शूटरने फ्रेडीवर दोन गोळ्या झाडल्या.

गोळीबार केल्यानंतर शूटर हे पळून गेले. गोळीबारानंतर फ्रेडी हा खाली पडला. तो गाडीच्या दिशेने धावत गेला. त्याने स्वतःच गाडी चालवत तो एका खासगी रुग्णालयात गेला. तेथे गेल्यावर त्याने घडल्या प्रकाराची माहिती डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी फ्रेडीला तत्काळ अॅडमिट करून त्याच्या शरीरातून दोन गोळ्या बाहेर काढल्या. गोळीबाराचे नेमके कारण समजले नाही. हा गोळीबार मालमत्तेच्या व्यवहारातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेची माहिती समजताच चारकोप पोलीस आणि फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळी आले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस शूटरचा शोध घेत आहेत. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची विविध पथके तयार केली आहेत. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.