
सामना प्रतिनिधी । मिरारोड
भाईंदर पूर्व भागातील एका इमारतीतील फ्लॅटचे छत कोसळून एकाच कुटुंबातील 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले आहेत.
भाईंदर पूर्व भागातील एम.आय. औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या साई पुष्पक इमारतीतील फ्लॅट क्र. 301 चे छत कोसळले, फ्लॅट मध्ये राहणाऱ्या खान कुटुंबियांवर तर आभाळच कोसळल्या सारखे झाले आहे. एकाच कुटुंबातील मुकीन खान (40) यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे तर मोहम्मद खलिफा खान (45), मोहम्मद नासिस खान (39), मोहम्मद हारुल खान (30), आशिया बेगम (28) हे 4 जण जखमी झाले आहेत.
जखमींना कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर इमारत 25 वर्षे जुनी आहे. 2 महिन्यांपूर्वी सोसायटीने सर्व सभासदांना दुरुस्ती साठी नोटीस बजावली होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतीच्या यादीत या इमारतीच्या नावाची नोंद नव्हती.



























































