बूलेट ट्रेनचे कर्मचारी म्हणणार ‘सायोनारा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भाजपच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेली बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी आता हिंदुस्थानी कर्मचारी जपानला जाणार आहेत. बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना जपानी भाषा येणं आवश्यक आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना सक्तीने जपानी भाषेचे धडे गिरवत आहेत.

बुलेट ट्रेनचं तंत्रज्ञान शिकण्यासाठी परदेशी पाठवण्यात येणारे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे कर्मचारी सध्या जपानी भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांना अभिवादनाचे शिष्टाचार शिकवण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांना ओहायू गोजाएमासू (गुड मॉर्निंग), कोनिचिवा (गुड आफ्टरनून), सायोनारा (टाटा बाय), देवामाता (पून्हा भेटू) असे काही प्राथमिक अभिवादनाचे शब्द शिकवण्यात येत आहेत.

गेले तीन महिने कर्मचाऱ्यांना दररोज संध्याकाळी एक तास हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तब्बल २५० कर्मचारी हे प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षणानंतर त्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेत पास झालेले कर्मचारी जपानला जाणार आहेत. यापूर्वी हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी जपानी भाषेचे प्रशिक्षण न घेताच २५-३० कर्मचारी जपानला गेले होते. पण, भाषेच्या अज्ञानामुळे त्यांना तंत्रज्ञान शिकता आलं नाही. जपानमध्ये गेल्यानंतर या कर्मचाऱ्यांना १४ दिवसांत बुलेट ट्रेन चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जपानची संस्कृती जाणून घेण्यासाठी तसंच दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं एनएसएसआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी म्हटलं आहे.