नांदेड जिल्हा बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद; धरणे, निदर्शने, रास्तारोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
नांदेड बस स्थानकात शुकशुकाट

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड शहर व जिल्ह्यात गुरूवारी मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आवाहनानुसार नांदेड बंद व जिल्हा बंदला उत्स्फु्र्त प्रतिसाद मिळाला. गुरूवार सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये व अन्य प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. शहरातील विविध भागात व चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको करुन प्रचंड घोषणाबाजी केली. जिल्ह्यातही या बंदला चांगला व उत्स्फु्र्त प्रतिसाद मिळाला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आवाहनानुसार नांदेड शहर व जिल्ह्यात बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला उत्स्फु्र्त प्रतिसाद मिळाला. नांदेड शहरातील छत्रपती चौक, राज कॉर्नर, आयटीआय, अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजीनगर दादरा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, लातूरफाटा, जुनामोंढा, नवामोंढा, तसेच शहराच्या अन्य महत्वाच्या चौकात आज मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणे व निदर्शने करुन तसेच रास्तारोको करुन आंदोलनात सहभाग नोंदविला. महिला, मुली, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक आदींचा यात मोठा समावेश होता. कौठा भागात व लातूरफाटा येथे ग्रामीण भागातील नागरिकांनी बैलगाड्या आणून आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आपल्या भावना नोंदविल्या. जवळपास तीन वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. शहरातील बाजारपेठा आज कडकडीत बंद होत्या. प्रशासनाने यापूर्वीच शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता.

नांदेड जिल्ह्यातील एकाही बसस्थानकातून बस बाहेर निघू शकली नाही. हदगाव येथील रात्रीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बस न सोडण्याचा निर्णय घेतला. शहरात यानिमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव व त्यांच्या टिमने कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

नरसीफाटा येथेही कडकडीत बंद
नरसीफाटा-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित बंदला नायगांव तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. नायगांव शहरातील गुरुवारचा आठवडी बाजार देखील भरला नाही. नरसीत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. बरबड्यात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला तर कुंटूर फाट्यावर शेकडो प्रवाशांना जेवण देवून आंदोलनात देखील सामाजिक भान जपल्याचे सुखद दृश्य दिसून आले.

नायगांव येथे उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, प्रा. रवींद्र चव्हाण, शिवराज पा. होटाळकर, प्रा. जीवन चव्हाण, नगरसेवक रमेश शिंदे, माणिक चव्हाण, पांडुरंग चव्हाण, संजय चव्हाण, प्रा. यादवराव शिंदे, शिवा वडजे, दत्ता पाटील आदींसह असंख्य समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला. हेडगेवार चौकात ठिय्या आंदोलन झाले. विशेष म्हणजे संबंध मराठवाड्यात प्रसिद्ध असलेला येथील गुरांचा आठवडी बाजार सुद्धा आज भरला नव्हता.

नरसी बाजारपेठ देखील कडकडीत बंद होती. चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भगवानराव भिलवंडे, दशरथ पा.भिलवंडे, निळकंठ ताटे, अनिल पवळे, सुधाकर भिलवंडे, दिगांबर भिलवंडे, बाळू भिलवंडे, बालाजी भिलवंडे, संदीप भिलवंडे, रोहीत भिलवंडे, चंद्रशेखर भिलवंडे, यशवंत नावंदीकर, पप्पू भिलवंडे, डॉ. ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली.

कुंटूर फाटा येथे आंदोलकांनी प्रवाशी नागरिकांना जेवणाची सोय करुन आंदोलनातही सत्कार्याची भावना जोपासली. येथे रस्त्यावरच जेवणाच्या पंगती बसल्याचे सुखद चित्र बघावयास मिळाले. बरबडयात संतप्त युवकांनी बैलगाडी मोर्चा काढला. तर कहाळा, खैरगांव, कुष्णूर, रातोळी, टेंभुर्णी फाटा, गडगा, होटाळा येथे चक्का जाम आंदोलन पार पडले. एकुणच नायगांव तालुक्यात सर्वत्र आजच्या बंदला चांगला प्रतिसाद दिसून आला.

आजचा बंद शांततेत पार पडावा यासाठी पोलीस उपअधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, सपोनि. अशोक जाधव, शरद मरे यांनी आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

किनवट कडकडीत बंद
किनवट-सकल मराठा क्रांतीठोक मोर्चाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ चौक येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनानुसार ठोक आंदोलन कडकडीत बंद पाळण्यात आला.

किनवट तालुक्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये, वाहतूक सेवा देणाऱ्या संस्था, व्यापारी, दुकानदार आदींनी  ९ ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग  घेतला. या बंद मध्ये दवाखाने, मेडिकल, इत्यादी अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. या आंदोलनाला तालुक्यातील विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला होता.

सर्वांनी शांततेच्या मार्गाने हा बंद पार पाडावा. कुठल्याही प्रकारची तोडफोड, जाळपोळ, हिंसा करु नये. संशयास्पद लोकांवर लक्ष ठेवावे, बंदला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी, सर्वसामान्य लोक, महिला, वृद्ध, मुले यांना बंद दरम्यान त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे मोर्चेकऱ्यांच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. यानुसार शांततामय व अहिंसक आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा, किनवटच्या वतीने सर्वाचे आभार मानण्यात आले.

देगलूरात कडकडीत बंद
देगलूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देगलूर तालुका व परिसरात वैद्यकीय सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. शहराच्या मुख्य रस्ता व बाजारपेठेत मोटारसायकल रॅली काढत बस आगारात गेली असता काही युवकांनी एसटीवर दगडफेक करुन काचा फोडल्याचा प्रकार वगळता इतरत्र बंद शांततेत पाळण्यात आला. देगलूर शहरातील प्रमुख रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत असून, शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये ओस पडल्याचे तर बाजारपेठा संपूर्णतः बंद होत्या. प्रवासी व माल वाहतूक, पेट्रोलपंप बंद ठेवून आरक्षणाला पाठिंबा समाजातील सर्वस्तरातील घटकांनी दिला. देगलूर-बिदर रस्त्यावर हणेगावनजिक मराठा समाजाच्या नागरिकांनी भगव्या टोप्या धारण करुन रास्तारोको अतिशय शांततेने करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बंदच्या आहवानाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी तत्पर होते. तसेच तालुक्यातील हणेगाव येथे रास्तारोको आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेले महसूलचे नायब तहसीलदार व्यंकट गोविंदवार हे पंचायत समितीच्या जीपने केले असता त्यांच्या जीपवर दगडफेक करण्यात आल्याने जीपचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान देगलूर आगाराची बस क्र. एमएच २० बीएल ३९०३ वर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली.

सारखणी येथे कडकडीत बंद
सारखणी- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा लक्षात असताना महाराष्ट्र बंदला सारखणी येथे बंदला उत्स्फु्र्तर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये सर्व व्यापारी, शाळा व अन्य प्रतिष्ठाने सामील झाली होती. हा बंद पूर्णतः कडकडीत व शांततेत पार पडला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मुक्रमाबाद बंदला प्रतिसाद
मुक्रमाबाद- मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळावे यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि.९ आँगस्ट रोजी देगलुर-रेणापुर या राज्य मार्गावर मुख्य बसस्थानक मुक्रमाबादवर समाज बांधवांनी शांततेत रास्तारोको आंदोलन केले. यावेळी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून पाठिंबा दिला.

गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक भव्य मुकमोर्चे राज्यभरात झाले, पण शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने परत आरक्षणाच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदच्या धर्तीवर मराठा आरक्षण कृती समितीचे सुभाष पाटील, बबन पाटील, दत्ता पाटील, शिवशंकर पा. शिंदे यांच्यासह मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर उतरुन शांततेत रास्तारोको आंदोलन केले. यावेळी मुक्रमाबादसह गोजेगाव, हाळणी, बाऱ्हाळी या गावात ठिय्या आंदोलन केले. बाऱ्हाळी येथे रस्त्यावर टायर जाळून शासन विरोधी घोषणा देत तीव्र निषेध केला. मराठा समाजाच्या विविध मागण्या करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनास शिवसेना, जय मल्हार सेना, व्यापारी यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला. यावेळी बालाजी पसरगे, मष्णाजी बाजगीरे,बालाजी बोधने, रामदास  माळेगावे यांची भाषणे झाले. सपोनि. सुनील नाईक यांच्या आदेशावरुन पो.उप.नि. निरीक्षक कवीता जाधव, बिट जमादार किशन चिंतोरे, रणजीत मुदीराज, माधव जळकोटे, बाबूराव गवते यांनी चोख पोलीस बंदोबस्त  ठेवला होता.