
सामना ऑनलाईन । सुरत
गुजरातमधील डांग जिल्ह्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस 200 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात वीसहून अधिक विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अद्याप तीन विद्यार्थी हे बेपत्ता असून त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. हे सर्व विद्यार्थी पहिले ते दहावीच्या वर्गातले आहेत.
सुरत कोचिंग सेंटरचे जवळपास ऐंशी विद्यार्थी डांग जिल्ह्यातील महल येथे पिकनिकला जात होते. शनिवारी रात्री बस बद्रिपाडा जंगलाजवळून जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस दरीत कोसळली. बसमधील मुलांचा आवाज ऐकून जंगलाजवळ राहणारे आदिवासी लोकं त्यांच्या मदतीला आली. त्यानंतर तत्काळ पोलीस व बचाव पथक मदतीला आले मात्र अंधार असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा येत होता. बचाव पथकाने मोबाईलचे फ्लॅशलाईट वापरून विद्यार्थ्यांना बाहेर काढले.




























































