मंदीची चाहूल! जागतिक शेअर बाजारात भूकंप; 57 वर्षातील सर्वाधिक घसरण…

जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम देशातील शेअर बाजारावरही झाला आहे. जगभरात मंदी येण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होती. मात्र, हिंदुस्थानी अर्थव्यवस्था भक्कम असल्याने जागतिक घडामोडींचा हिंदुस्थानवर फारसा परिणाम होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत होते. मात्र, जगातील सर्वच शेअर बाजारात भूकंप झाला असून देशातील शेअर बाजाराला बसलेल्या धक्क्यांनी हिंदुस्थानचा शेअर बाजारही कोसळला आहे.

शेअर बाजारात गेल्या आठवड्यात शुक्रवारी मोठी घसरण झाली होती. त्यामुळे जगभरात येणाऱ्या मंदीची ही चाहूल आहे काय, असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, देशातील बाजारात तेजी असल्याने तसेच आपली अर्थव्यवस्था स्थिर असल्याने जागतिक घडामोडींचा फारसा परिणाम होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, या आठवड्याच्या व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला आहे. याचा सर्वाधिक फटका सरकारी कंपन्यांच्या शेअरला बसला आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. सरकारी कंपन्याचे शेअर्स, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. शेअर बाजारातील या घसरणीमागे जागतिक अस्थिरता हे प्रमुख कारण आहे. मात्र, देशातील शेअर बाजारावर जागतिक मंदीचा फारसा परिणाम होणार नाही आणि बाजार या घसरणीतून लवकरच सावरेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

जागतिक शेअर बाजारात भूकंप

अमेरिकेच्या शेअर बाजारात घसरण सुरुच आहे. त्यानंतर जपानच्या शेअर बाजारातही त्सुनामी आली. त्याचा परिणाम जगातील सर्वच शेअर बाजारांवर झाला आहे. तैवानमधील निर्देशांक ताइपे 8.4 टक्क्यांनी घसरला आहे. ही तेथील 57 वर्षातील सर्वाधिक घसरण आहे. 1967 नंतर एकाच दिवसात बाजारात झालेली ही मोठी घसरण आहे. जपानचा शेअर बाजारही निक्केई 12 टक्क्यांनी घसरला आहे. जपानच्या बँकांनी व्याजदराबाबत घेतलेल्या निर्णयाने जपानी चलन येनमध्ये डॉलरच्या तुलनेत तेजी आली आहे.

जगातील सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेलाही या घसरणीचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकेतील फ्युचर्स व्यवहारातून ही घसरण सुरूच राहण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेचा शएअर बाजार डाऊ जोन्समध्ये 400 अंकांची घसरण झाली आहे. तर नॅसडॅक फ्यूचर्समध्ये 700 अंकाची घसरण दिसत आहे. अमेरिकेने जारी केलेल्या मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयमुळे ही घसरण होत आहे. तसेच अमेरिकेत बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने शेअर बाजारावर दबाव आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारातील दिग्गज कंपन्या Nvidia, Intel, Apple, Broadcom Inc यांच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली आहे.

दक्षिण कोरियाच्या शएअर बाजाराला लोअर सर्किट लागले आहे. 2001 नंतर दक्षिण कोरियाच्या बाजारात सोमवारी सर्वाधिक घसरण झाली आहे. चीनमधून मागणी घटल्याने जागतिक मंदीची चाहूल आणखी गडद होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाची मागणी चीनमध्ये घटली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या आहेत. त्यामुळे जगातील सर्वच शेअर बाजारावर त्याचा परिणाम होत आहे. इटली, हाँगकाँग आणि फ्रान्समधील शेअर बाजारातही 5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. मात्र, 57वर्षातील सर्वाधिक घसरण झालेल्या तैवानच्या बाजारावर जगाच्या नजरा आहेत. आता या परिस्थितीतून देशातील बाजार कधी सावरणार याची गुंतवणूकदार वाट बघत आहेत.