फुलपाखरू होऊया

1051

>> आयझॅक किहिमकर, फुलपाखरु अभ्यासक

आज आणि उद्या आपल्या मुंबईत फुलपाखरू महोत्सव भरला आहे. अनेकरंगी देखणी फुलपाखरं… आपल्याला अवघड असणारं जगणं सहज सोपं करतात. आपल्या निष्पाप… रंगीबिरंगी भिरभिरण्याने…

फुलपाखरू… आजही आपल्या सभोवती वाढलेल्या क्राँक्रीटच्या जंगलातही कानाकोपऱयात असणाऱया छोटय़ाशा हिरवळीवर, खिडकीत, इमारतीच्या गच्चीत ही लोभसवाणी फुलपाखरं भिरभिरताना दिसतात. जोपर्यंत ती आपल्या डोळय़ांना दिसतात तोपर्यंत पर्यावरण आणि निसर्गाचं चक्र सुरळीत आहे असं समजावं.

ब्रिटनपेक्षा जास्त फुलपाखरं मुंबईत आहेत. लंडन, इंग्लडला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी फुलपाखरं आहेत; पण मुंबईत एकूण एकशेसाठ विविध प्रकारची फुलपाखरे आढळतात. हिंदुस्थानात फुलपाखरांच्या दीड हजार वेगवेगळय़ा जाती आहेत. त्यातले एकशे साठ प्रकार मुंबईत आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर आणि नवी मुंबईतील काही डोंगर भागांतही आहेत. साधारण दीडशेपेक्षा जास्त फुलपाखरं मुंबईत आहेत.

प्रत्येक फुलपाखरू विशिष्ट जातीच्या झाडावरच अंडी घालतात. ‘कॉमन मॉरमॉन’ हे फुलपाखरू लिंबू आणि कढीपत्त्यावरच अंडी घालते. ‘ग्रास डिमन’ हे फुलपाखरू फक्त सोनटक्क्यावरच अंडी घालते. अशी त्याची प्रत्येक जात विशिष्ट वनस्पतीवरच अंडी घालते. मादी प्रत्येक पानाला पायाने स्पर्श करते. त्यामुळे तिला ती वनस्पती कोणती आहे ते कळतं. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे अशा झाडांच्या दिशेने त्या जातात. इमारतीच्या सातव्या-आठव्या मजल्यावरही ती पोहोचतात. लाल आणि पांढऱया पंखावर काळे ठिपके असलेलं, छोटं नखाएवढं फुलपाखरूही दुसऱया-तिसऱया मजल्यावर पोहोचतं. ते पानफुटीच्या झाडावर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अंडी घालतं.

मुंबईत मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होतेय. अचानक वणवे लागतात, प्रदूषण वाढते आहे. यामुळे बरीचशी फुलपाखरे नाहीशी होत आहेत. हिरवळ नाहीशी झाली आहे, अशा वेळी फुलपाखरू सुचवतं की, निसर्गचक्र बिघडलंय. ज्यावेळी तुमच्या आजूबाजूला फुलपाखरं उडायची, पक्ष्यांचे ओरडणे बंद झाले, त्यावेळी पर्यावरणावर काहीतरी विपरीत परिणाम झाला आहे असे समजावे. त्यांना वातावरण बदललंय हे आधीच जाणवतं. ते त्यांची ठिकाणे सोडून जातात. स्थलांतर करतात. माथेरानसारख्या ठिकाणी जास्त पाऊस पडायला लागला की ब्लू मॉरमॉन हे फुलपाखरू स्थलांतर करतं आणि मुंबईला येतं. ते चार महिन्यांनी परत जातं. तेव्हा त्याची चौथी किंवा पाचवी पिढी असते. एवढा वेळ ते मुंबई किंवा परिसरात पाऊस कमी असलेल्या ठिकाणी राहतं. पाचवी पिढी पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी परत कशी जाते हे कोडं अजून सुटलेलं नाही. हिंदुस्थानातून काही फुलपाखरे थेट कन्याकुमारीपर्यंत वाटेत कुठेही न थांबता उडत जातात. किंग्जस्टन रोज हे फुलपाखरू दर हिवाळय़ात कन्याकुमारीपासून उडत जातं. तसेच समुद्र ओलांडून श्रीलंकेला पोहोचतात.

फुलपाखरांच्या पंखांना जर मायक्रोस्कोपच्या खाली पाहिलं तर ते खवलांसारखं असतं. त्यांना दोन प्रकारचे रंग असतात. एक म्हणजे खरे रंग आणि काही रंग त्या पंखांवर नसतातच तो आभास असतो. जेव्हा सूर्यप्रकाश त्या पंखांवर पडतो तेव्हा न दिसणाऱया रंगांचा आभास होतो. विशेषतः चमकणारे रंग. यामध्ये मोरपीस, साबणावरचा रंग, पेट्रोल जेव्हा पाण्यावर पडतं तेव्हा जे रंग दिसतात तो रंगांचा आभास आहे. अशाच प्रकारे बऱयाचशा फुलपाखरांना निळे आणि मोरपिशी रंग असतात, पण ते आभासाचे रंग असतात.

अळी अवस्थेत असताना बरीचशी फुलपाखरं विषारी वनस्पती खातात. रुईच्या झाडाचा रस अत्यंत fिवषारी असतो. या झाडाची पानं प्लेन टायगरच्या अळय़ा पचवू शकतात. त्याचा विषारी अंश ती आपल्या शरीरात साठवून ठेवतात. पूर्ण फुलपाखरू तयार झालं की, हळूहळू बाहेर फिरायला लागतं. तेव्हा कधी कधी हळू उडणारे पक्षी या फुलपाखरावर झडप घालतात. अशा वेळी फुलपाखराच्या शरीरात असलेले विषारी द्रव त्या पक्ष्याला लागतात. त्या विषारी वनस्पतीच्या अंशाचा स्पर्श पक्ष्याच्या शरीराला होताच त्याला उलटय़ा होतात, तो मरत नाही, पण फुलपाखराला सोडून देतो. तसेच फुलपाखरांना असलेले भडक रंग हे त्यांचे वॉर्निंग कलर आहेत. ते सुंदर दिसण्यासाठी आहेत असं वाटत असलं तरी ते पक्ष्यांना सावध राहण्याचे रंग आहेत. अशा प्रकारे फुलपाखरू विषारी पानं खाऊन आपले संरक्षण करते. तसेच काही फुलपाखरांच्या पंखांचे आकार सुकलेल्या पानांसारखे असतात. त्याचे पंख उघडले की निळय़ा रंगांचे दिसतात आणि बंद झालं की सुकलेल्या पानासारखं दिसतं. पक्षी निळय़ा रंगाचे फुलपाखरू शोधते; पण ते पानासारखं झालेलं असतं. ही निसर्गाची कलाकृती आहे.

काही छोटी नखाएवढी फुलपाखरं, ज्यांना ब्लूज म्हणतात. त्यांना शेपटीच्या बाजूला डोळे आणि मिश्या असतात. ते स्वतःवरील आघात चकवू शकतात. फुलपाखराचं आयुष्य एक ते दीड महिना असतं. फुलपाखरांचं आयुर्मान वाढवण्यासाठी आपण माणसं काहीही करू शकत नाही, पण त्यांच्या वाढीसाठी ती आपल्या अवतीभवती भिरभिरण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. आवश्यक असलेलं पर्यावरण त्यांना लाभलं की त्यांची वाढ चांगली होते. त्यांचे काही भक्षकही असतात. यामध्ये काही कीटक, पक्षीही आहेत. मुख्यतः हिरवाई टिकायला हवी. त्याची जोपासना करायला हवी. अशा जागी राहणे ते पसंत करतात. त्याचा फायदा आपलेही आरोग्य टिकून राहण्यासाठी होतो. दिवस चांगला जातो. मनःस्थिती चांगली राहते. सकाळी माझ्या बागेत हे सगळं डोळय़ांना दिसलं की मला सुखद वाटतं.

संवर्धनासाठी कायदा…
वाघ, सिंह यांसारख्या वन्यप्राण्यांप्रमाणे फुलपाखरू हेही वन्यप्राणीच आहेत. पाळीव प्राण्यांसारखं फुलपाखराला घरी पाळता येत नाही. बंदिस्तही ठेवता येत नाही. त्यामुळेच आपल्याकडील फुलपाखरांच्या बागाही उघडय़ा आहेत. काचेत बंद नाहीत. ठाण्याच्या ओवळेकरवाडीत असलेली फुलपाखरांची बागही उघडीच आहे. तिथे फुलपाखरू आपणहून येतात आणि आपणहून जातात. वन्यप्राणी संरक्षण अधिनियम कायदा 1972 अंतर्गत फुलपाखरांनाही संरक्षण देण्यात आले आहे.

माणसांपासून धोका
काही ठिकाणी कीटकनाशकं, रासायनिक द्रव्यं मोठय़ा प्रमाणात वापरली जातात. त्यामुळे फुलपाखरं मरत नाहीत, कारण त्यांच्यासाठी विष नवीन नाही. ते विष पचवू शकतात. कदाचित त्यांची पहिली पिढी विषामुळे मरून जाईल, पण त्यांच्या दुसऱया पिढीला त्या विषाची सवय होते. जंगलतोड, वृक्षतोड, हिरवळ जात चाललेली आहे. हा त्यांच्या वाढीसाठी धोका आहे. आता पेवर ब्लॉक आले आहेत. अशावेळी मी बऱयाचदा लोकांना विचारतो की, तुमच्या पायाला माती कधी लागली होती? यामुळे फुलपाखरांची संख्या कमी होत चाललेली आहेत. ती आजूबाजूला बागडत आहेत तोपर्यंत पर्यावरण चांगलं आहे. जेव्हा नाहीशी होतील तेव्हा नक्कीच समजावं की, पर्यावरण बिघडलंय. एवढी ती निसर्गाबाबत संवेदनशील असतात.

फुलपाखरांच्या बागेसाठी
फुलपाखराद्वारेच आपण निसर्गाच्या प्रेमात पडू शकतो. त्यांचे रंग, सौंदर्य यामुळे त्यांच्याकडे कोणीही आकर्षित होतं. त्यामुळे ज्यांना निसर्गाची आवड आहे त्यांनी आपल्या अवतीभोवती फुलपाखरांची वाढ होईल अशी झाडे लावावीत. आम्ही ‘आय नेचरवॉच फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत शाळा, महाविद्यालये, बागा इत्यादी ठिकाणी मोफत फुलपाखरांच्या बागा आम्ही तयार करून देतो.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या