इस्तियाक मालेगाव संघाचा जेतेपदावर कब्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळय़ातील मुंबई अग्निशमन मुख्यालयात रंगलेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेच्या निमित्ताने मालेगाव शूटिंगबॉल शो रंगला. इस्तियाक मालेगाव संघाने अचूक खेळाचा नमुना सादर करत विजेतेपदावर झेंडा रोवला.

 किशोर घाडीगावकर स्मृतिचषकासाठी मुंबईच्या अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच आणि  मुंबई शूटिंगबॉल संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेत मालेगावच्या इस्तियाक संघ आणि आयएससी संघात अंतिम सामना रंगला आणि संघर्षपूर्ण लढतीत इस्तियाक मालेगावने आयएससी मालेगावचा 15-07, 16-14 असा पराभव केला. इस्तियाक, यासीन व मुबासिर यांच्या दमदार खेळाला वकारने दुसऱया सेटमध्ये जोरदार आव्हान दिले, मात्र विजय इस्तियाकच्या बाजूने झुकला.

उपांत्य फेरीत आयएससी मालेगावने आमीर काझी यांच्या संजय भोसले प्रतिष्ठान (सोलापूर) संघावर 15-06, 15-06 अशी मात केली, तर इस्तियाक मालेगावने सांगली संघाला 06-15, 15-11, 15-08 असे हरवले.

मालिकावीराचा मान इस्तियाकने (मालेगाव) मिळवला तर सर्वोत्तम शूटर संदेश घारे (सांगली) ठरला. उपउपांत्य फेरीत अमीर काझी सोलापूर, इस्तियाक मालेगाव, आयएससी मालेगाव व सांगली संघ विजयी ठरले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भगत, मंगेश भोसले, रत्नदीप रावराणे, महेश कदम, प्रफुल्ल वाईरकर, मिलिंद बिर्जे, सूरज चव्हाण, दीपक सावंत यांनी परिश्रम घेतले. उद्घाटन व बक्षीस समारंभ अग्निशमन अधिकारी भोर, एस.डी. सावंत, पाटील, सांगळे, बोरुले उपस्थित होते. तसेच नगरसेवक रोहिदास लोखंडे, समीर चव्हाण, दत्तप्रसाद पेडणेकर, गजानन आंगणे, घोष, विशाल विश्वासराव, जितेश गोरुले, शाम सावंत, निखिल शेडगे, पंडितशेठ पाटील, माणिक (बंधू) साटम यांची उपस्थिती लाभली. स्पर्धेचे सर्व चषक सूरज चव्हाण यांनी पुरस्कृत केले.