
>> आशिष बनसोडे
कळत-नकळत गुन्हा घडल्यामुळे कारागृहात जाण्याची वेळ आली तरी त्या चार पोलादी भिंतीच्या बाहेर पडल्यानंतर सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावे याकरिता भायखळा कारागृहातील महिला सध्या खाद्यपदार्थ बनविण्याचे धडे घेत आहेत. त्यांना फ्रूट कस्टर्ड, ग्रेव्ही बनविण्याचे प्रक्षिशण देण्यात येत आहे.
कारागृहात गेल्यावर कैद्यांना शिक्षा म्हणून त्यांना विविध प्रकारची कामे करायला सांगितले जाते. असा आजवरचा समज होता, परंतु कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांना आत्मनिर्भर जीवन जगता यावे याकरिता त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर भायखळा जिल्हा महिला कारागृहात सध्या कैदी महिलांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. कारागृहातील प्रशस्त व अत्याधुनिक साधनांनी युक्त अशा भिशी म्हणजेच स्वयंपाकगृहात कैदी महिलांना फन क्लब फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. रुणाली आणि शमझा या शेफ महिलांना प्रशिक्षण देत आहेत.
खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रशिक्षणाला मोठा प्रतिसाद महिलांकडून मिळतोय. येथून बाहेर गेल्यानंतर या प्रशिक्षणाचा त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी नक्कीच खूप फायदा होणार आहे. 40 महिलांचा गट बनवून त्यांना प्रशिक्षित शेफकडून प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण झाले तरी त्यांना सराव करण्याची संधीदेखील उपलब्ध करून देणार आहोत.
– विकास रजनलवार, अधीक्षक (मुंबई जिल्हा महिला कारागृह)
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कारागृहात सुरू केलेल्या या प्रशिक्षणाला कैदी महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवीन शिकण्यास मिळत असून त्यातून स्वतः प्रगती करता येण्यासारखे असल्याने कैदी महिला पुन्हा या प्रशिक्षणात सहभागी होण्यास इच्छुक असल्याचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी अमृता दशवंत यांनी सांगितले. तर येथून बाहेर गेल्यानंतर या प्रशिक्षणाच्या जोरावर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास त्यांना नक्कीच हातभार लागेल, असे तरुंगाधिकारी स्मितल पाटील यांनी सांगितले.
Empowerment Behind Bars: Byculla Women Jail Inmates Get Professional Cooking Training
Female inmates at Mumbai’s Byculla Jail are receiving training in making food items like fruit custard and gravies to lead a dignified life after release.





























































