
बेकायदा बाईक टॅक्सी तसेच ओला, उबर व रॅपिडो कंपन्यांच्या मनमानी भाडे आकारणीविरोधात अॅपआधारित कॅब आणि रिक्षाचालकांनी शनिवारी देशव्यापी लाक्षणिक बंद पुकारला आहे. संपूर्ण राज्यभरात अॅपआधारित 11 लाख, तर मुंबई महानगरातील 6 लाख रिक्षांची प्रवासी सेवा ठप्प राहणार आहे. तसेच लाखो टॅक्सी बंद राहणार असल्याने मोठय़ा प्रमाणावर प्रवासी सेवा कोलमडणार आहे.
मागील अनेक महिन्यांपासून राज्यातील रिक्षा, कॅबचालक विविध आंदोलनांच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर परिवहन विभागाने ओला, उबर व रॅपिडो कंपन्यांना सरकारच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. मात्र सरकारच्या आदेशांना केराची टोपली दाखवली गेली. त्याबाबत संबंधित कंपन्यांवर ठोस कारवाई करण्यास परिवहन विभाग धजावत नसल्याची नाराजी अॅपआधारित रिक्षा आणि टॅक्सीच्या चालकांनी व्यक्त केली आहे. बेकायदा बाईक टॅक्सीसेवेमुळे काही नागरिकांचे मृत्यू झाले, तर अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्व आले. अशा सेवा बेकायदा असल्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना विमा लाभ मिळत नाही, असे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले. शुक्रवारच्या बंदमध्ये राज्यभरातील 11 लाख, तर मुंबई महानगरातील 6 लाखांहून अधिक रिक्षा सहभागी होतील.



























































