
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे खातेवाटप तसेच मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. हिवाळी अधिवेशनानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, राज्यात यापूर्वीही खातेवाटपाशिवाय अधिवेशन पार पडले आहे. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी संपूर्ण अधिवेशनाचे कामकाज पार पाडले हाते. आता तर मुख्यमंत्र्यांसह आम्ही सहा मंत्री असल्याने हिवाळी अधिवेशनाचे कामकाज करताना कसलीही अडचण भासणार नाही. मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन संपताच अगदी दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. खातेवाटपही एकाच वेळी करण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
खातेवाटपाबाबत उद्या बैठक – थोरात
खातेवाटपाबाबत उद्या बैठक होणार आहे. यामध्ये खातेवाटपाचा विषय पूर्ण होईल. हे सरकार पाच वर्षे चालवायचे आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेळ लागला तरी लवकरच खातेवाटप होईल असे काँग्रेसचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत बोलताना यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपद न देण्याबाबत सोनिया गांधी यांनी काहीही म्हटले नसल्याचा खुलासाही थोरात यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे स्पष्टवक्ते
भुजबळ म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला आहे. उद्धव ठाकरे हे स्पष्टवक्ते आहेत, खरे बोलणारे आहेत. एखादी गोष्ट पटल्यानंतर तातडीने निर्णय घेतात. असे जर खुलेपणाने बोलणारे नेते असतील तर ते आपल्याला अधिक आनंद होतो, असेही भुजबळ यांनी सांगितले.


























































