
कॅनडामध्ये पंजाबच्या एका तरुणावर 9 जुलै रोजी हल्ला झाला होता आणि 14 जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून मृतदेह हाती येण्याआधीच आईने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. त्यानंतर आई-मुलाचे एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, गुरविंदर नाथ नावाच्या तरुण दोन वर्षांपूर्वी कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेला होता. तो टोरंटोच्या लॉयलिस्ट कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेण्टचे शिक्षण घेत होता. आपल्या खर्चांना पूर्ण करण्यासाठी तो पार्ट टाईम डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. 9 जुलै रोजी रात्री मिसिसॉगा शहरात डिलिव्हरी दरम्यान त्याच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्याची कारही लुटली. त्यानंतर गुरविंदरला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अनेक दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांना तो प्रतिसाद देत नव्हता आणि 14 जुलै रोजी त्याने प्राण सोडला. गुरविंदरच्या मोठ्या भावाने त्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबापासून लपविण्याचा प्रयत्न केला आणि गुरविंदरला फोन करू नये म्हणून त्याच्या वडिलांचे इंटरनेट ब्लॉक केले.
आयमा चहल गावातील दूध डेरी चालवणारे गुरविंदरचे वजिल कृष्णा देव यांनी सांगितले की, ”मला माझ्या पत्नीच्या आत्महत्येनंतर गुरविंदरच्या मृत्यूबाबत कळले. मी आज सर्वकाही गमावले. मी काही दिवसांपूर्वी गुरविंदरला फोन करण्याचा प्रयत्नही केला, मात्र माझा इंटरनेट सुरु नव्हता. गुरविंदरची आई शेजाऱ्यांना सांगायची की, जर माझ्या मुलाला काही झाले तरी मी त्याला एकट्याला जाऊ देणार नाही. एकदिवशी गुरविंदर याची आई नरिंदर देवी दारात कपडे वाळत घालत होती. तेव्हा तिने कोणाला बोलताना ऐकले की, गुरविंदरचा मृतदेह येत आहे. ते ऐकून तिच्या पायाखालची जमिन सरकली आणि धक्का बसलेल्या आईने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही तिला एकटीला सोडले नाही. मात्र गुरुवारी घराबाहेर जाऊन तिने विषारी औषध घेतले आणि आत्महत्या केली. कृष्ण देव यांनी सांगितले की, गुरविंदरवर याआधीही हल्ला झाला होता.




























































