
गाझापट्टीत अमानुष नरसंहार घडवून आणणाऱ्या इस्रायल व अमेरिका जोडीला आणखी एक झटका बसला आहे. ब्रिटन, फ्रान्स या बड्या देशांनंतर आता कॅनडानेही पॅलेस्टाइनला मान्यता देण्याचे संकेत दिले आहेत.
गाझामधील हल्ले इस्रायलने थांबवावेत व अन्न-पाण्यावाचून जाणारे बळी रोखावेत अशी मागणी जगभरातून होत आहे. मात्र इस्रायल थांबायला तयार नाही. अमेरिकाही इस्रायलला आणखी हल्ले करण्यास प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे जगातील अनेक देश पॅलेस्टाइनच्या बाजूने उभे राहताना दिसत आहेत. यात आता कॅनडाची भर पडली आहे. मध्य आशियातील वादावर कॅनडाने द्विराष्ट्रवादाचा उपाय सुचवला आहे. पॅलेस्टाइन आणि इस्रायल या दोन्ही देशांनी शांततेत नांदावे, अशी कॅनडाची भूमिका असल्याचे पंतप्रधान मार्प कार्नी यांनी स्पष्ट केले. येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचा तीळपापड
कॅनडाच्या घोषणेमुळे अमेरिकेचा तीळपापड झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे. कॅनडा पॅलेस्टाइनला मान्यता देणार आहे. या निर्णयामुळे आम्हाला कॅनडाशी व्यापारी करार करणे कठीण जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.