
पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या जयश्री भोंडवे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेला एबी फॉर्मच गायब झाल्याचे आढळून आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उमेदवारास घडय़ाळ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे, मात्र अद्यापही त्यांचा एबी फॉर्म सापडलेला नाही. या प्रकरणास जबाबदार निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत पाटील यांच्याकडील कामकाज काढून घेण्याची कारवाई करत त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अजित पवार गटाच्या जयश्री भोंडवे यांनी प्रभाग 16 मधून ओबीसी महिला आरक्षणांतर्गत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्जासोबत त्यांनी पक्षाचा अधिपृत एबी फॉर्म जोडला होता, मात्र उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान एबी फॉर्म गहाळ झाल्याचे कारण पुढे करत निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी भोंडवे यांना अपक्ष उमेदवार ठरवले. या निर्णयाविरोधात जयश्री भोंडवे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात त्यांनी अर्ज दाखल करताना एबी फॉर्म सादर केल्याचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओग्राफी तसेच अन्य तांत्रिक पुरावे सादर केले. या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्याने न्यायालयाने यासंदर्भात स्वतंत्र सुनावणी घेऊन सर्व बाबींची तपासणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले.
त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एबी
फॉर्म गहाळप्रकरणी सुनावणी घेतली. यामध्ये जयश्री भोंडवे यांनी मुदतीत उमेदवारी अर्ज आणि एबी फॉर्म निवडणूक कार्यालयात सादर केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हर्डीकर यांनी भोंडवे यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरला. त्यामुळे अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या जयश्री भोंडवेंना चिन्ह वाटपात घडय़ाळ चिन्ह दिल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र हा घोळ ज्यांच्यामुळे झाला ते निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची आता बदली करण्यात आली आहे.
अद्यापही एबी फॉर्मची शोधाशोध सुरूच
जयश्री भोंडवे यांनी एबी फॉर्म सादर केल्याचे व्हिडीओ पुराव्यात दिसून येत आहे, मात्र अद्यापही तो सापडलेला नाही, त्याची शोधाशोध सुरू आहे. अन्य पुठल्या तरी दस्ताला तो लागलेला असावा. न्यायालयाने एबी फॉर्मबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार चौकशी करण्यात येत असल्याचे हर्डीकर यांनी स्पष्ट केले.



























































