
पुण्यातील भाऊ इंडस्ट्रियल भागात मेणबत्त्या बनविण्याच्या कारखान्यात पावडरचे वजन करताना अचानक आग लागली. या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला असून दोन कामगार जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग पूर्णपणे विझविण्यात आली जखमींची नावे समजू शकली नाहीत.
नांदेड फाट्यानजीक सर्वे नंबर 14 मधील इंडस्ट्रीयल भागातील एका कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला सकाळी 10 वाजून 22 मिनिटांना मिळाली. त्यानुसार अग्निशमनदल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. नांदेड फाटा परिसरातील इंडस्ट्रीयल भागात भाऊ इंडस्ट्रीज कारखान्यात स्पार्कींग करणाऱ्य़ा मेणबत्त्या बनविण्याचा कारखाना आहे. त्याठिकाणी फटाक्यासाठी वापरली जाणारी दारू मेणबत्ती बनविण्यासाठी वापरण्यात येते.
पुण्यातील नांदेड फाट्याजवळ असलेल्या भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशम दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे. pic.twitter.com/HQZHySTIAi
— Saamana (@SaamanaOnline) September 16, 2021
सकाळी कंपनीत नेहमीप्रमाणे 18 कामगार कामावर आले होते. त्यावेळी स्पार्कीग पावडरचे वजन करताना अचानक कंपनीत आग लागल्यामुळे भडका उडला. त्यामुळे कामगारांनी उठून बाहेर पळ काढला. परंतु, तीन कामगार आगीत सापडल्यामुळे त्यातील एकाचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्हीही जखमी कामगारांना बाहेर काढले.
घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तब्बल सव्वा तासानंतर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. संबंधित कंपनीने कोणतेही फायर ऑडीट केले नसल्याचे शक्यता वर्तविण्यात येत असून पुढील तपासात सर्व बाबी उघड होतील अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, कारखान्यात आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी तळ ठोकून होत्या.





























































