इमारतीतील दुकानांची स्वतंत्र सोसायटी असू शकत नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, उपनिबंधकांचे आदेश रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इमारतीत असणाऱ्या दुकानांची स्वतंत्र सोसायटी म्हणून नोंदणी होऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. एका इमारतीतील दहा दुकानदारांनी एकत्र येऊन सोसायटी नोंदणीसाठी उपनिबंधकांकडे अर्ज केला. यावर इमारतीतील मूळ गृहनिर्माण सोसायटीने आक्षेप घेतला. हा आक्षेप अमान्य करत उपनिबंधकांनी या दहा दुकानदारांच्या सोसायटी नोंदणीस मंजुरी दिली. याविरोधात मूळ गृहनिर्माण सोसायटीने याचिका दाखल केली होती.
न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. एका इमारतीचे नियमानुसार व कायदेशीररित्या दोन भाग झाल्याशिवाय स्वतंत्र सोसायटीची नोंदणी करता येत नाही. एकाच इमारतीतील दुकानांची स्वतंत्र सोसायटी म्हणून नोंदणी केल्यास मूळ कायद्याला बगल देण्यासारखे आहे, असे नमूद करत न्यायालयाने उपनिबंधकांचे आदेश रद्द केले.

आराखडय़ानुसार इमारतीची उभारणी

मंजूर आराखडय़ानुसार इमारतीचे बांधकाम झाले आहे. 1986पासून या इमारतीची देखभाल एकच गृहनिर्माण सोसायटी करत आहे. ही दुकाने याच सोसायटीचा भाग होती. ही दुकाने इमारतीपासून वेगळी आहेत, असे कायदेशीर वर्गीकरण झालेले नाही. त्यामुळे अशा दुकानांची स्वतंत्र सोसायटी होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण

सरिता को.ऑ. हाऊसिंग सोसायटीने ही याचिका केली होती. या इमारतीत 56 घरे व दहा व्यावसायिक दुकाने आहेत. या दुकानदारांनी स्वतंत्र सोसायटी नोंदणीसाठी अर्ज केला. यावर मूळ सोसायटीने आक्षेप घेतला. तरीही उपनिबंधकांनी या दहा दुकानांच्या स्वतंत्र नोंदणीस परवानगी दिली. याविरोधात मूळ सोसायटीने अपील दाखल केले. अपील प्राधिकरणाने हे अपील फेटाळून लावले. अखेर मूळ सोसायटीने न्यायालयाचे दार ठोठावले.

चौपाटीवरील दर्शक गॅलरीकडे दुर्लक्ष

मुंबईचा समुद्रकिनारा आणि शहराचे सौंदर्य पर्यटकांना जवळून न्याहाळता यावे यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात गिरगाव चौपाटी येथे पर्यटकांसाठी ‘दर्शक गॅलरी’ खुली केली होती. 2022मध्ये शिवसेना पक्षप्रमुख, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गॅलरीचे लोकार्पण झाले होते. तत्कालीन पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही दर्शक गॅलरी उभी राहिली. सध्या पालिकेच्या ‘डी’ विभागाच्या दुर्लक्षामुळे या गॅलरीची दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी काचा गायब झाल्या आहेत. पर्यटकांसाठी उभारलेल्या शौचालयाला दरवाजा नसल्याने दुर्गंधी पसरत आहे.
z छाया ः सचिन वैद्य